नवी मुंबई : रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून कारटेप चोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ७ गुन्ह्यांची उकल झाली असून त्याच्याकडून चोरीचे २२ कारटेप हस्तगत करण्यात आले आहेत. तो सोलापूरचा राहणारा असून वाशी व कोपर खैरणे परिसरात कारटेप चोरी करायचा.
वाशी, कोपर खैरणे परिसरात सातत्याने कारटेप चोरीच्या घटना घडत होत्या. रात्रीच्या वेळी रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारच्या काचा फोडून टेप चोरले जात होते. त्यामागे सराईत गुन्हेगाराचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार गुन्हे शाखेकडून या गुन्ह्यांची उकल करण्यावर जोर देण्यात आला होता. त्यासाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सह आयुक्त संजय मोहिते, गुन्हे शाखा अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष १ चे वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे यांचे तपास पथक तयार करण्यात आले होते. त्यामध्ये सहायक निरीक्षक निलेश पाटील, हर्षल कदम, हवालदार रोहिदास पाटील, सुमंत बांगर, अजय वाघ आदींचा समावेश होता.
सदर घडलेल्या घटनांच्या परिसरातील खासगी सीसीटीव्ही तपासून संशयितांची माहिती मिळवली होती. त्यामध्ये मिळालेल्या माहितीवरून मुंबईपर्यंत तपास पथकाने मागोवा घेतला. त्यात सोलापूर मधील एका संशयिताची माहिती मिळाली असता सोलापूरच्या हनमगावातून अभिषेक अशोक कुमार (३०) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबुली देत इतर दोन साथीदारांची देखील माहिती दिली. त्यानुसार पोलिस त्या दोघांचा शोध घेत आहेत. तिथेही कल्याण ते तळोजा परिसरात भाड्याने राहणारे आहेत. रात्रीच्या वेळी वाशी, कोपर खैरणे परिसरात येऊन कारटेप चोरी करत होते. त्यांच्याकडून ७ गुन्ह्यांची उकल झाली असून २ लाख २० हजार रुपये किमतीचे २२ कारटेप हस्तगत करण्यात आले आहेत.