- मंगेश कराळे नालासोपारा - एटीएम कार्डची अदलाबदली करत पैसे काढून नागरिकांना फसविणाऱ्या सराईत आरोपीला तुळींजच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे. या आरोपींकडून ६ गुन्ह्यांची उकल करून वेगवेगळ्या बँकेचे ५० एटीएम कार्ड हस्तगत केले आहे. याचे कोण कोण साथीदार आहेत का, याने कुठे अजून गुन्हे केले का याचा पोलीस तपास करत आहे.
मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कोणत्या ना कोणत्या पोलीस ठाण्यात एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. त्याबाबतीत दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल आणि आरोपींना पायबंद घालण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी दिले आहेत. तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरेंगावच्या जिजाई नगरमधील साई निवास अपार्टमेंटमध्ये राहणारे दीपक साईल (४७) यांची देखील फसवणूक झाली होती.
१७ जुलैला ते मोरेंगाव नाक्यावरील एस बी आय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करून त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये काढण्यात आले होते. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. घटनास्थळी पाहणी करून पोलिसांनी तांत्रिक पुरावे हस्तगत केले. महितीदाराने माहिती दिली की दोन आरोपींनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी प्रधुग्न यादव (२२) याला अटक करून तुळींज ३, आचोळे २ आणि पेल्हार १ असे सहा गुन्ह्यांची उकल केली. आरोपीकडून ५० वेगवेगळ्या बँकेचे एटीएम कार्ड जप्त केले आहे.
आरोपीबाबत माहिती मिळाल्यावर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने यूपी राज्यातील जोनपूर येथून आरोपीला अटक केले आहे. त्याची वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलीस कस्टडी सुरू आहे. याचा एक साथीदार फरार आहे. त्याचा शोध घेत गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. - राजेंद्र कांबळे (पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे)