मुंबई - मीरा रोड येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या हत्येने संपूर्ण देशात हादरला आहे. मनोज साने (52) वर, 32 वर्षीय सरस्वतीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा समोर आला आहे. मनोज आणि सरस्वती यांचे लग्न झाले होते आणि त्यांनी मंदिरात लग्न केले होते, असे सांगण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे, सरस्वतीने आपल्या बहिणींनाही या लग्नासंदर्भात माहिती दिली होती. मात्र असे असले तरी, ती मनोजला मामा म्हणूनच सांगत असे.
सरस्वतीला तीन बहिणी आहेत. लहानपणी त्यांचे आई-वडील विभक्त झाले होते. आई-वडील विभक्त झाल्यानंतर सरस्वती आपल्या आईसोबत राहत होती. मात्र काही वर्षांतच तिच्या आईचाही मृत्यू झाला. यानंतर, सरस्वती अहमदनगर येथील जानकीबाई आपटे बालिका आश्रमात राहू लागली होती. त्यांनी येथेच पहिली ते दहावीपर्यंतच शिक्षण घेतले. दहा वर्षे ती याच आश्रमात होती.
सरस्वतीने वयाची 18 वर्षेपूर्ण झाल्यानंतर आश्रम सोडला आणि ती छत्रपती संभाजीनगर येथे बहिणीसोबत राहू लागली. ती चार वर्षे बहिणीसोबत होती. यानंतर ती मुंबईला शिफ्ट झाली आणि येथेच ती मनोज सानेच्या संपर्कात आली.
मनोज सानेने नौकरी मिळवण्यासाठी केली मदत - यानंतर, मनोज सानेने सरस्वतीला मुंबईत नोकरी मिळवण्यासाठी मदत केली. सरस्वतीला मुंबईत राहण्यासाठी जागा मिळात नव्हती, तेव्हा मनोजने तिला बोरिवलीतील आपल्या फ्लॅटमध्ये जागा दिली. ती काही काळ बोरिवलीतच मनोजच्या फ्लॅटमध्ये राहिली. याच काळात हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी नंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना कायदेशीरपणे लग्न करायचे होते. मात्र, नंतर त्यांनी मंदिरात लग्न केले.
मनोज साने आणि सरस्वती हे गेल्या सात वर्षांपासून मीरा रोड येथील फ्लॅटमध्ये राहत होते. सरस्वती मुळची छत्रपती संभाजीनगरची आहे. आश्रमात सरस्वतीचे काही शैक्षणिक कागदपत्रेही होते. यासाठी ती मनोजसोबत नेहमीच अहमदनगरला जात असे. येथे तिने मनोज आपला मामा असल्याचे सांगितले होते. आता सरस्वतीच्या बहिणींचे जबाब नोंदवले जात आहेत. त्यांची डीएनए चाचणीही केली जाणार आहे.