चुल्हाड - सिहोरा (भंडारा) : घरकुल ठरावाची प्रोसेडिंग कॉपी मागण्याच्या कारणावरुन महिला सरपंच व ग्रामसेविका यांच्यात शिवस्वराज्य दिनी फ्रीस्टाईल झाली. ही घटना तुमसर तालुक्यातील सिलेगाव येथे रविवारी घडली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ग्रामसेविका यांच्या तक्रारीवरुन सिहोरा पोलिसांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य महिलांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
माहितीनुसार, सिलेगाव ग्रामपंचायत येथे शिवस्वराज्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सरपंच संध्या पारधी व ग्रामसेविका मंजुषा सहारे यांच्यात घरकुल वाटपाचा ठरावावर वाद झाला. तसेच प्रोसिडिंग कॉपी मागण्यावरुन वाद वाढतच गेला. प्रोसिडिंग कॉपी हिसकावण्याचाही प्रकार घडला. याप्रसंगी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्य मनिषा रहांगडाले यांनी ग्रामसेविका यांना जातीवाचक शिवीगाळ करत अपशब्द बोलल्याने वाद वाढला. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. तसेच प्रोसिडिंग कॉपी हिसकावून नेली. ग्रामसेविका सहारे यांच्या तक्रारीवरुन सिहोरा पोलिसांनी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४,५०६, ३४ सह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
शिवस्वराज्य दिनी महिला पदाधिकारी व अधिकारी यांच्यात झालेल्या मारहाणीचा विषय सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, सरपंचाने दिलेल्या तक्रारीवरुन, ग्रामसेविका व ग्रामपंचायत सदस्याविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.