लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ड्रग्ज प्रकरणातील सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्याचा सखोल तपास आवश्यक आहे. हा देशातील तरुणाई नासवण्याचा प्रकार आहे. या गुन्ह्यांच्या मुळाशी जायचे आहे, असे सांगून तपास अधिकारी व गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी ललितसह दोन्ही आरोपींना चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी चौदा दिवसांची कोठडी न देता ७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
ड्रगतस्कर ललित पाटील याने साकीनाका पोलिसांच्या ताब्यात असताना अंधेरी न्यायालयात आपल्या जीविताला धोका असल्याचा दावा केला आहे. यावेळीही ललितचे वकील संदीप बाली यांनी आरोग्य आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित करीत त्याच्या जिवाला धोका असल्याचा पुनरुच्चार केला. त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ललितला कुणापासून धोका आहे, असे विचारले असता बाली यांनी ‘संबंधित ॲथॉरिटी’ असा शब्दप्रयोग केला. त्यावर न्यायालयाने ललित पुण्यात सुखरूप पोहोचला आहे ना, अशी टिपणी केली.