सातारा : सातारा पोलीस ठाण्याने आज अॅड.गुणरत्न सदावर्ते रिमांडसाठी सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य सदावर्ते यांनी केले होते.
दीड वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्ष आणि बचाव पक्षाच्या वतीने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. दोन्ही बाजुंचे म्हणणे झाल्यानंतर न्यायालयाने अॅड. सदावर्तेना दि. १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दीड वर्षापूर्वी एका वाहिनीवरती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार उदयनराजे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी सदावर्ते यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. मात्र, त्यांना अटक झालेली नव्हती. आठ दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटीच्या कर्मचाºयांनी हल्ला केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यावेळी सातारा पोलीस शहर ठाण्यातील गुन्ह्यात अॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण, अॅड. सदावर्ते यांना पोलीस कोठडी मिळाली होती. त्यामुळे पोलिसांना दोन दिवस थांबावे लागले. त्यानंतर अॅड. गुणरत्ने यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर सातारा पोलिसांनी जिल्ह्यातील गुन्ह्याची माहिती न्यायालयासमोर मांडली. न्यायालयाच्या आदेशाने गुरुवारी सकाळी सातारा पोलिसांनी अॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेतले. त्यानंतर सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास त्यांना सातारा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली व कोठडीत ठेवण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जिल्हा न्यायालयात नेण्यात आले. याठिकाणी सहावे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. ए. शेंडगे यांच्यासमोर सरकार पक्ष, फिर्यादीचे वकील आणि बचाव पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. त्यांनतर न्यायालयाने अॅड. सदावर्ते यांना चार दिवस, दि. १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
वकील गुणरत्न सदावर्ते सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांना चौकशीसाठी काल सातारा पोलीस स्टेशनला आणले. मुंबईतील आर्थर रोड जेलमधून सकाळी सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ताब्यात घेत सातारा शहर पोलीस ठाण्यात काल दाखल करण्यात आले. त्यावेळी भारतमाता की जय अशा घोषणा गुणरत्न सदावर्ते यांनी दिल्या. दरम्यान शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजी राजे भोसले यांचा एकेरी भाषेत उल्लेख करत बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पाटण तालुक्यातील कोंजवडे येथील राजेश निकम यांनी ही तक्रार दाखल केली.