लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: टीईटी पेपरफूट प्रकरणात सौरभ त्रिपाठीचा सहभाग अस्सल्याचे निष्पन्न झाल्यानंतर, सायबर पोलिसांनी त्याला लखनौ येथून अटक केली. परीक्षेत अपात्र ठरलेल्या साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांची यादी त्रिपाठीनेच इतर साथीदारांच्या मदतीने केल्याची माहिती सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी न्यायालयाला दिली. त्याला ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
२०१८ मध्ये निघालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या जाहिरातीनुसार, १५ जुलै २०१८ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल १२ ऑक्टोबर २०१८ मध्ये लागला होता. जी. ए सॉफ्टवेअरचा व्यवस्थापक अश्विन कुमार याच्याकडे परीक्षेचे आयोजन व निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी होती. त्याचाच फायदा घेऊन तत्कालीन आयुक्त सुखदेव डेरे, तुकाराम सुपे, प्रीतीश देशमुख, अभिषेक सावरीकर, सौरभ त्रिपाठी, संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांनी संगनमत करून गैरव्यवहार केल्याचे तपासात समोर आले आहे.
शिक्षकांच्या पगारातूनही सुपेची कमाई
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारातील आरोपी तुकाराम सुपे याने केवळ राज्य परीक्षा परिषदेमधील पदाचा गैरवापर करून कोट्यवधींची कमाई केली नाही तर पुणे विभागीय शिक्षण मंडळातील शिक्षकांचे ऑनलाइन पगार देण्यासाठी आवश्यक ‘शालार्थ आयडी’ देण्यासाठीही लाच घेत असल्याचे तपासातून पुढे आले आहे.