सातारा: अत्याचार आणि छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी शाळेतील मुलांना मार्गदर्शन करून हेल्पलाइन नंबर दिला होता. या हेल्पलाइन नंबरमुळेच महाबळेश्वरमधील एका शाळेच्या मुख्याध्यापकाचे बिंग फुटले. पंधरा वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करत असल्याची माहिती एका मैत्रिणीने हेल्पलाइनवर फोन करून दिल्यानंतर घृणास्पद प्रकाराचा भांडाफोड झाला.
महाबळेश्वर शहरातील नावाजलेल्या एका शाळेतील दिलीप रामचंद्र ढेबे (वय ५०, रा. मेटगुताड, ता. महाबळेशवर) या मुख्याध्यापकाने आपल्या पदाचा दबाव आणून दहावीमध्ये शिकत असलेल्या एका १५ पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण महिलादिनीच उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी मुख्याध्यापक ढेबे याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवस पोलीस कोठडी सुनावली. हे प्रकरण नेमके समोर कसे आले. याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. मुख्याध्यापक आपल्यावर वारंवार आत्याचार करीत असल्याची माहिती पीडित मुलीने आपल्या एका मैत्रिणीला सांगितली होती. संबंधित शाळेमध्ये २२ फेब्रुवारी रोजी लैंगिक आत्याचारावर महाबळेश्वर पोलीस ठाण्याचेसहायक पोलीस निरिक्षक अब्दुल हादी बिद्री यांनी मुलींना मार्गदर्शन केले होते. यावेळी चाईल्ड हेल्प लाईनची माहिती देऊन
हेल्प लाईनचा १०९८ हा क्रमांक पोलिसांनी मुलींना दिला होता. तसेच हा नंबर शाळेच्या फलकावर देखील लावला होता. पीडित मुलीच्या एका मैत्रिणीने सहज हेल्प लाईनचा नंबर फिरवला तर तिला तत्काळ प्रतिसाद मिळाला. पीडित मुलीच्या मैत्रिणीने आपल्या मैत्रिणीवर आत्याचार होत असल्याची माहिती त्यांना दिली. हे एकून पोलीस अवाक झाले. हेल्पनाइलच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन महाबळेश्वर पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या. महाबळेश्वर पोलिसांनी गत पाच दिवस तपास करून पीडित मुलीचा शोध घेतला. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन सर्व माहिती तिच्याकडून काढून घेतली. त्यावेळी पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली. वर्षेभर मुलीवर अत्याचार केला जात होता. त्यामुळे पोलिसांनी तातडीने मुख्याध्यापक ढेबे याला अटक केली. पीडित मुलीच्या मैत्रिणीने जर हेल्पलाईन नंबरवर माहिती दिली नसती तर मुख्याध्यापकाच्या तावडीतून पीडित मुलीची सुटका झाली नसती. पुढे अनेकवेळा ती मुलगी आत्याचारास बळी पडली असती. पीडित पिडीत मुलीच्या मैत्रिणीने समय सूचकता दाखवून केलेल्या धाडसामुळे मुख्याध्यापक गजाआड झाला.
हेल्पलाइन यशस्वीजिल्ह्यातील प्रत्येक शाळेत जाऊन पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. मुलींची छेडछाड होत असल्याने त्यांनी कशापद्धतीने याला सामोरे जावे, यासाठी पोलिसांनी हेल्पलाइन नंबरही शाळेत दिले आहेत. महाबळेश्वरमधील हे प्रकरण समोर आल्याने पोलिसांची जनजागृती कामी आली.