नवी दिल्ली - दिल्लीतील रोहिणी कोर्टामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका शास्त्रज्ञाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपीने रोहिणी कोर्ट नं. १०२ मध्ये बॉम्ब ठेवला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचा एका वकिलासोबत वाद होता. त्यामुळे तो त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला तपासादरम्यान, आरोपी शास्त्रज्ञाविरोधात अनेक पुरावे मिळाले आहेत. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामध्ये हा शास्त्रज्ञ एकटाच सहभागी होता, असे समोर आले आहे. रोहिणी कोर्टामध्ये ९ डिसेंबर रोजी ब्लास्ट झाला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि एसएसजीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. सध्या पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. तसेच त्याच्याशी संबंधित माहिती गोळा करत आहेत. तसेच आरोपीचा कुठल्या वकिलासोबत वाद सुरू होता, याबाबतही माहिती घेतली जात आहे.
ब्लास्टची चौकशी करत असलेल्या टीमने कोर्टाला सांगितले की, ४० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले आहेत. त्याशिवाय स्पेशल सेलने रोहिणी परिसर आणि त्याच्या आसपासच्या मोबाईल टॉवरमधून डम्प डाटाही गोळा केला होता. ज्यावेळी हा स्फोट झाला तेव्हा आसपासच्या १ किलोमीटर परिसरात असलेल्या मोबाईल नंबरची माहिती सखोलपणे स्कॅन करण्यात आली. हे नंबर फिल्टर करून पोलिसांनी संशयिताच्या नंबरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्टामध्ये ज स्फोट झाला तो इम्प्रोव्हाइज्ड एक्स्पोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) होता. आयईडी स्टिलच्या टिफिनमध्ये एका जुन्या काळ्या बॅगमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र आयईडी योग्य प्रकारे असेंबल न झाल्याने स्फोट हा कमी क्षमतेचा झाला.