हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी एका वाहनचालकाला पकडले आहे, ज्याची आजपर्यंत 117 वेळा पावती फाडली गेली, परंतू त्याने एकदाही दंडाची रक्कम भरलेली नाही. गेली सात वर्षे हा स्कूटर चालक पोलिसांना चकमा देत होता. त्याच्यावर आतापर्यंत 30000 रुपयांचा दंड बसला आहे.
या स्कूटर चालकाचे नाव फरीद खान आहे. त्याला पोलिसांनी नामपल्लीमध्ये विना हेल्मेट स्कूटर चालविताना पकडले. वाहतूक पोलिसांनी जेव्हा त्याच्या गाडीचा नंबर त्यांच्या अॅपवर टाकला तेव्हा पोलिसांचे डोळे विस्फारले. त्याच्या गाडीने 117 वेळा नियम मोडले होते आणि पावत्या बनल्या होत्या. परंतू त्याने त्यापैकी एकही पावती भरलेली नव्हती. ही रक्कम 29720 रुपये झाली होती.
फरीद खानने 7 वर्षांमध्ये एकही चलन भरले नाही. पोलिसांनी त्याची स्कूटर जप्त केली आणि सर्व दंड भरून वाहन नेण्यास सांगितले. खानला यासाठी एक नोटीस पाठविण्यात आली ज्यामध्ये सांगितले गेले की, चलन भरा नाहीतर वाहन जप्त करण्यासाठी आरोपपत्र दाखल केले जाईल.
पोलिसांनी त्याचे वाहन जप्त केले आहे. तसेच त्याला नोटीस दिली आहे. वाहतूक नियमानुसार जर एखाद्याने 10 पेक्षा जास्त वेळाचे चलन भरले नसेल तर पोलिसांना ते जप्त करण्याचा अधिकार आहे. ई-चलन वेबसाईटनुसार 2014 पासून खानच्या गाडीला ज्या पावत्या फाडण्यात आल्या त्या विनाहेल्मेट आणि नो पार्किंगमध्ये गाडी लावल्याच्या आहेत. कोरोना काळात काही चलन ही मास्क न लावल्याची आहेत. काही चलन ही राँग साईडने स्कूटर चालविल्याची आहेत.