मुंबई - प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील मलबार हिल परिसरातील अँटीलिया Antilia या बंगल्यासमोर आज सायंकाळी ६ वाजल्यापासून संशयास्पद कार आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. घटनास्थळी मुंबई पोलिसांचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील देखील दाखल झाले असून घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आली आहे.
या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटीन हे स्फोटक, धमकीचे पत्र आणि ४ गाडीच्या नंबर प्लेट आढळून आल्या असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. पोलीस पथकासह घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तसेच फॉरेन्सिकचे पथक, एसएसजीची सिक्युरिटी दाखल झाली असून हा घातपाताचा कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. धमकीच्या पत्रात अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याबाबत मजकूर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच मुकेश अंबानी यांच्या आलिशान बंगल्याबाहेर संशयास्पद कार आज सायंकाळी आढळून आल्याने त्यांच्या सुरक्षा रक्षकाने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या स्कॉर्पिओ कारवर लावण्यात आलेली नंबर प्लेट देखील बोगस आल्याची माहिती मिळत आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांना याआधी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मात्र, आज त्यांच्या बंगल्याबाहेर वाढलेल्या संशयित कारमुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. सुरुवातील ही पोलिसांची मॉकड्रिल असल्याची अफवा पसरली होती. मात्र, प्रत्यक्षात हा घातपाताचा कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे सर्व यंत्रणांना, तसेच पोलिसांना सर्व खबरदारी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा तपास करणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.