पूनम अपराज
अनोळखी इसमाने महिलेच्या नावे फेसबुकवर मैत्री करून एका इसमाला WhatsAppवर पॉर्न व्हिडीओ दाखवून त्याचा स्क्रीन रेकॉर्डिंग केला. त्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंग पसरवण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करून ते स्वीकारले. याप्रकरणी एन. एम. जोशी पोलीस ठाण्यात १६ मार्च रोजी भा. दं. वि. कलम ३८४, आयटी ऍक्ट ६७, ६७ अ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर तीन महिने आरोपींचा पाठपुरावा करून पोलिसांनी राजस्थानातील अलवर येथून त्रिकुटाला बेड्या ठोकल्या. अटक आरोपींची नावे सुनील कुमार (२३), जैकम दिन (३२) आणि हामाद उर्फ अजगर अली कादरी (२६) आहेत. हे सर्व राजस्थानचे आहेत.
सुरेश (नाव बदललेले) हे १५ मार्चला रात्री 08.05 वा. दरम्यान त्याच्या कार्यालयात असताना मोबाईल क्रमांकावरुन अनोळखी इसमाने महिलेच्या नावे फिर्यादीशी फेसबुकवर मैत्री करून WhatsAppद्वारे नग्न स्वरूपात व्हिडिओ कॉल केला. प्रत्यक्षात मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्यासमोर दुसऱ्या मोबाइलवरून महिलेचा कपडे उतरविण्याचा पॉर्न व्हिडीओ दाखवला. हा अश्लील व्हिडिओ दाखवताना स्क्रीन रेकॉर्डिंग करून तो सुरेशला पाठवून पसरवण्याची धमकी देऊन पैशाची मागणी करून पैसे स्वीकारले म्हणून फिर्यादीच्या तक्रारीवरून १६ मार्चला गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपास अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपआयुक्त,परिमंडळ 03, वरळी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त, ना. म. जोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रताप भोसले आणि गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निखिल शेळके, मध्य विभाग सायबर पोलीस ठाणेचे पो.उप.नि. बी. पी. पाटील,पोलीस शिपाई राठोड, पोलीस शिपाई ठेंगले यांनी आरोपीबाबत तांत्रिक कौशल्य वापरून तपास करून आरोपी हे जिल्हा-अलवर,राज्य-राजस्थान येथील असल्याचे निष्पन्न केले. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे अलवर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याने व गुन्हा करण्यासाठी वापरातील मोबाईल क्रमांक फक्त WhatsAppसाठी वापरून त्याचा शोध घेणे कठीण असताना स्थानिक पोलीस व गुप्त बातमीदार यांच्या मदतीने माहिती घेऊन एकूण तीन आरोपींना जिल्हा -अलवर,राज्य- राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे.