लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटर्सपर्यंत शस्त्रे पोहोचविण्यास मदत करणारा नवी मुंबईतील भंगारवाला भागवतसिंग ओमसिंग (वय ३२) याला गुन्हे शाखेने रविवारी अटक केली. न्यायालयाने त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता १० वर पोहोचली असून, मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम लोणकर, शिवकुमार गौतम, मोहम्मद जिशान अख्तर यांच्यापर्यंत पोहोचण्यास गुन्हे शाखेला अद्याप यश आलेले नाही. या आरोपींच्या शोधासाठी विविध पथके मुंबईबाहेर आहेत. आतापर्यंत गुरुमेल सिंग, धर्मराज कश्यप, हरिशकुमार निसाद, नितीन सप्रे, संभाजी पारधी, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन दिलीप पारधी, राम फुलचंद कानोजिया यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १० जिवंत काडतुसे, शिवकुमार यादव आणि सुमित यादव या नावाचे आधार कार्ड, मोबाइल, सीमकार्ड तसेच अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
उदयपूरमधून शस्त्रे
पोलिस चौकशीत कनोजियाला मुंबईत शस्त्र पोहोचविण्यासाठी भागवतसिंगने मदत केल्याचे समोर येताच त्यालाही अटक करण्यात आली. भागवतसिंग हा बेलापूरचा रहिवासी असून, त्याच भागात त्याचे भंगाराचे दुकान आहे. एका गुन्हेगाराच्या ओळखीतून तो कनोजियाच्या संपर्कात आला. त्यानुसार, मे महिन्यात उदयपूरमधून त्याने हत्येसाठी शस्त्रे आणली होती.
शस्त्र पुरवठ्याची कसून चौकशी
शस्त्रांसाठी त्याला जास्तीच्या पैशांचे आमिष दाखविण्यात आले होते. त्याने कनोजियाच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठीही मदत केल्याचे समोर येत आहे. त्याला ही शस्त्रे कोणी व कशी पुरवली? तसेच यामध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे? आणखी शस्त्र पुरवठा कुठे कुठे केला आहे? याबाबत गुन्हे शाखा त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहे.