चाकण : आंबेठाण चौकातील राजगुरूनगर सहकारी बँकेसमोर स्कॉर्पिओ गाडीची काच फोडून चोरट्यांनी तीन लाख रुपये लुटल्याची घटना रविवारी दुपारी घडली. याबाबत देशमुखवाडीचे सरपंच संजय ज्ञानेश्वर देशमुख ( वय ४६, रा. स्वप्न नगरी, चाकण ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .ठाणे अंमलदार रामचंद्र कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे-नाशिक महामार्गालगत बँकेच्या आवारात ही चोरी करण्यात आली आहे. याबाबतची फिर्याद देशमुखवाडीचे सरपंच संजय ज्ञानेश्वर देशमुख ( वय ४६, रा. स्वप्न नगरी, चाकण ) यांनी दिली आहे. देशमुख यांनी ट्रक विकून आलेले तीन लाख रुपये स्कॉर्पिओ गाडी क्रमांक (एम एच १४ डी आर ७१७२ ) तील पिशवीत ठेवून ते बँकेत चेक भरण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून त्यांच्या गाडीची काच फोडली व पैशांची बॅग घेऊन पोबारा केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे पुढील तपास करीत आहेत. राजगुरूनगर बँकेसमोर सातत्याने रोख रक्कम लुटण्याच्या घटना घडत असल्याने ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही भरदिवसा बँकेच्या आवारात चोरीच्या घटना घडल्या आहेत.
चाकण येथे स्कॉर्पिओ ची काच फोडून तीन लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:49 PM
अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून त्यांच्या गाडीची काच फोडली व पैशांची बॅग घेऊन पोबारा केला.
ठळक मुद्देसातत्याने रोख रक्कम लुटण्याच्या घटना घडत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर