मुंबई महापालिका निवडणुकीची तारीख आणि पावसाळा जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसे मनसे आणि शिवसैनिकांमधील वाद तापू लागले आहेत. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून होत असलेला वाद आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. जोगेश्वरी पूर्वमध्ये आज दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाले सफाईवरून तुफान राडा झाला. यामध्ये मनसे कार्यकर्त्याचा डोळा थोडक्यात बचावला आहे. (dustup between Shiv sena MNS on Nala Safai. )
जोगेश्वरी पूर्वेला शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे यांच्या घराजवळ नाल्याची सफाई सुरु आहे. प्रभाग क्रमांक 73 मध्ये मजासवाडी येथे सफाई चालू होती. यावेळी मनसेचे कार्यकर्ते प्रविण मर्गज यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. यावेळी त्यांची बाचाबाची झाली. दोन्ही बाजुचे कार्यकर्ते जमले होते. मनसेने या कामावर आक्षेप घेतला होता. शिवसेनेचे नगरसेवक प्रविण शिंदे हे सुद्धा तिथे पोहोचले. यामुळे त्यांच्यात बाचाबाची सुरु होती. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मनसेचे प्रविण मर्गज यांच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाल्याची माहिती मेघवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिपळे यांनी दिली आहे. मारामारीची घटना कळताच पोलिसांची टीम तिथे पोहोचली. त्यांनी दोन्ही कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले, घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले.