कल्याण: हरीयाणा राज्यातून अपहरण झालेल्या दोघा अल्पवयीन मुलींचा अवघ्या दोन तासांत कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांकडून शोध घेण्यात आला. ही घटना सोमवारी घडली. सुरक्षितरित्या या दोन्ही मुलींना कायदेशीर कारवाईनंतर हरियाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
हरियाणातून १५ आणि १८ वर्षे वयाच्या दोन अल्पवयीन मुलींचे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याबाबत तेथील सीटी तावडू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान तेथील तपास पथकाला अपहत दोन्ही मुली कल्याणमध्ये असल्याची माहीती मिळाली परंतू हरियाणातून तपास पथकाला कल्याणात पोहोचण्यास वेळ लागणार आहे. त्यामुळे या मुलींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घ्यावे, अशी विनंती तेथील सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक जसविर सिंग यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांना मोबाईलवरून सोमवारी केली. अपहत घटनेचे गांभीर्य ओळखून होनमाने यांनी ही माहीती पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील यांना दिली आणि त्यानंतर अपहृत मुलींचा कल्याण परिसरात शोध घेण्याची जबाबदारी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या पथकावर सोपविली. पथकाने कल्याण रेल्वे स्थानक, एसटी स्टॅन्ड, मार्केट परिसरात अपहृत मुलींना हुडकून काढण्यासाठी त्यांच्या मिळालेल्या वर्णनांच्या आधारे शोध मोहीम राबवली.
दिलेल्या वर्णनाप्रमाणो दोन्ही अल्पवयीन मुली लक्ष्मी भाजी मार्केटच्या गेटसमोर भांबावलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पथकातील महिला पोलिसांच्या मदतीने या मुलींना ताब्यात घेऊन त्यांची आस्थेवाईकपणो चौकशी केली असता त्या हरीयाणा राज्यातून अपहरण झालेल्या मुलीच असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती कळताच हरीयाणा राज्यातील सिटी तावडू पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक सिंग यांनी पोलिस पथकासह कल्याण गाठले. कायदेशिर कारवाईनंतर या दोन्ही मुलींना सिंग यांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान अपहृत दोन्ही अल्पवयीन मुलींची माहिती मिळाल्यापासून अवघ्या दोन तासांत शोध घेऊन त्यांना हरियाणा पोलिसांच्या सुखरूप ताब्यात देण्याची उल्लेखिनय कामिगरी बजावणा-या पोलिसांचे पूर्व उपप्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने-पाटील यांनी कौतुक केले.