लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : सराफाच्या दुकानात घुसून दोन चोरट्यांनी शनिवारी धारधार हत्याराने वार करून ४८ वर्षीय किशोर जैन यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज नालासोपारा पोलिसांनी ताब्यात घेत दोन आरोपींविरोधात हत्या, दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांची १६ पथके या दोन्ही फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
नालासोपारा पश्चिमेकडील चंद्रेश पॅलेसमधील दुकान नंबर-७ मध्ये असलेल्या साक्षी ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानात शनिवारी सकाळी दुकान मालक किशोर जैन हे लॉकर रुममध्ये असताना दोघे दुकानात घुसले. या चोरांना पाहून त्याने दुकानातील अलार्म वाजविल्यानंतर दोघांनी हातपाय बांधून अर्धा तास मारहाण करीत चाकू, कैचीने हत्या केली आहे. दरम्यान, चोरांनी दुकानातील किती मुद्देमाल नेला हे अद्याप समजलेले नाही.
दोन्ही आरोपी हत्या करून दुकानातून चालत नालासोपारा रेल्वे स्थानकाकडे गेले. त्यांनी ओव्हर ब्रीजवरून पूर्वेकडील मंगावो मार्टमध्ये खरेदी करण्याच्या बहाण्याने शिरले व नंतर चहेती चायच्या दुकानाबाहेर १० ते १५ मिनिटे उभे होते. त्यांनतर रेल्वे स्थानकावरून रेल्वे पकडून मुंबईच्या दिशेने निघून गेले. पोलिसांनी या सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळविले आहेत. ३० ते ३५ वयोगटांतील दोन आरोपींच्या मिळालेल्या वर्णनावरून आणि तांत्रिक माहितीवरून पोलीस शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा लवकरच तपास लागेल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पोलीस आयुक्तांनी दिली घटनास्थळी भेटमीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी शनिवारी संध्याकाळी भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दरम्यान, नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेकडील सराफ असोसिएशनचे पदाधिकारी आणि अंदाजे ३०० सराफांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात दाते यांची भेट घेऊन आरोपींना लवकरात लवकर पकडण्याची मागणी केली.
पोलीस आयुक्त सदानंद दाते यांची पदाधिकारी व सोनारांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात शनिवारी संध्याकाळी भेट घेतली. या दिवसाढवळ्या झालेल्या खुनी हल्ल्यामुळे सराफांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. यामुळे लवकरात लवकर दोन्ही आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे.- केशरसिंग राजपूत, अध्यक्ष, ज्वेलर्स असोसिएशन