लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गोवंडीच्या विशेष बालगृहातून पळून गेलेल्या ६ अल्पवयीन मुलींपैकी दोन मुली मानखुर्द परिसरातच सापडल्या. त्यांच्या चौकशीतून पोलीस अन्य मुलींचा शोध घेत आहे. पळून गेलेल्या मुलींमध्ये १७ वर्षांच्या तीन, १५ वर्षांच्या दोन आणि १६ वर्षांच्या एका मुलीचा समावेश आहे. गोवंडीतील सायन-ट्रॉम्बे रोडवर अल्पवयीन मुलींसाठी शासकीय मुलींचे विशेष पुनर्वसन केंद्र (विशेष बालगृह) आहे. तेथील ही घटना होती.
न्यायालयाच्या आदेशाने या मुलींना येथे काळजी व संरक्षण देण्यासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते. रविवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान या वसतिगृहाची सिमेंटची खिडकी दगडाने फोडून आणि त्या खिडकीचे लोखंडी ग्रील काढण्यात आले. तसेच, त्या खिडकीच्या बाहेरील बाजूला असणारे लोखंडी ग्रील हे वाकवून मुलींना येथून पसार करण्यात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर केंद्राच्या निशिगंधा विठोबा भवाळ (३१) यांच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवत गोवंडी पोलिसांनी शोध सुरु केला. यामध्ये दोन मुली त्याच परिसरात मिळून आल्या. याप्रकरणी गोवंडी पोलीस अधिक तपास करत आहे.