- दत्ता यादव
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: हल्ली कोणी कशाची सहानभूती मिळवेल याचा नेम नाही, अशाच एका युवकाने चोरलेल्या दुचाकी विकण्यासाठी 'आई' या नावाचा पुरेपूर वापर केला. आई आजारी आहे. अवघ्या दोन हजार, तीन हजारात दुचाकी देतोय घ्या, अशी गळ घालून तो नागरिकांकडून सहानभूती मिळवत होता. एक दोन नव्हे तर तब्बल दहा दुचाकी त्याने कवडीमोल भावात केवळ आईच्या नावाखाली विकून टाकल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
सातारा शहरासह विविध ठिकठिकाणाहून दुचाकी चोरणार्या आशुतोष दिपक भोसले (वय २२, मूळ रा.कुशी ता.सातारा, सध्या रा. संभाजीनगर, सातारा) याला शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने अटक केलीय. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर बरीच धक्कादायक माहिती त्याच्या बोलण्यातून समोर आली. आशुतोष भोसले हा गाड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करत होता. या व्यवसायात आता कुठे तो जम बसवत होता.
मित्र, पै पाहुण्यांच्या गाड्या तो एकमेकांना विकायचा. हे करत असतानाच एके दिवशी त्याला भन्नाट कल्पना सुचली. दुचाकी चोरल्यानंतर त्या विकायचा कुठे असा प्रश्न त्याला पडला होता. गाडी चोरून आणल्यानंतर आई आजारी आहे. हॉस्पिटलमध्ये पैसे लागणार आहेत असं जर सांगितलं तर गाडी खरेदी करणारी व्यक्ती सहानभूतीने आपली गाडी नक्कीच खरेदी करेल आणि आपला डावही साध्य होईल. असं त्याला वाटलं. नुसतच वाटलं नाही तर त्याने त्याची अंमलबजावणीही करण्यास सुरुवात केली. एक दोन करत त्याने केवळ दोन महिन्यात तब्बल दहा दुचाकी चोरल्या.
कधी मित्राची आई आजारी आहे तर कधी स्वतःची आई आजारी आहे असं सांगून तो २ ते ५ हजारला दुचाकी विकायचा. घेणारे इतक्या स्वस्तात गाडी मिळतेय म्हटल्यानंतर त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गाडी घ्यायचे. मात्र कागदपत्राचा विषय आल्यानंतर आता काही गडबड नाही बघू नंतर असं म्हणून तो वेळ मारून न्यायचा. परत मात्र तो गाडी मालकाकडे फिरकायचा नाही. तर इकडे गाडी मालकाला कवडीमोल भावाने गाडी मिळाल्याचा आनंद व्हायचा.
गाडीही गेली अन् पैसेही गेले...
जेव्हा पोलीस या गाड्या खरेदी करणाऱ्यांच्या दारात पोहोचले. तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. गपगुमान त्यांनी गाड्या पोलिसांच्या हवाली केल्या. गाडीही गेली आणि आपले पैसे गेले. याची जाणीव त्यांना झालीच शिवाय चोरीची दुचाकी विकत घेणे हा सुद्धा गुन्हा आहे. मात्र पोलिसांनी या सर्वांचा सहानुभूतीने विचार केला. त्यामुळे त्यांच्यावर गजाआड होण्याची वेळ आली नाही.