ठाणे - आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाच करोड रुपये किंमतीचे ट्रामडोल ड्रग्ज ठाणे खंडणी विरोधी पथकाने पकडले आहे. ट्रामडोल ड्रग्ज त्यालाच फायटर ड्रग्ज असे म्हटले जाते. याचा आयएसआयमधील अतिरेकी, इराण, इराकमध्ये टेरोरिस्ट ऑर्गनायझेशनमध्ये वापर केला जातो. जर एकाद्या अतिरेक्याला गोळी लागली आणि त्याने जर हे ड्रग्ज घेतले तर त्याला वेदना जाणवत नाहीत. पाच ते सहा तास त्या व्यक्तीच्या संवेदना बधिर होतात. याच कारणामुळे वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या औषधांवर बंदी घातली आहे , आणि याच औषधाच्या एकूण 9800 स्ट्रीप्सचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
ठाणे खंडणी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथील ब्रम्हांड येथे सापळा रचून मयुर प्रविण मेहता (वय 46) याला 9800 गोळ्यांच्या स्ट्रीप्ससह ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता हे औषध तो भारतामध्ये व भारताबाहेर बेकायदेशीर मार्गाने विकणार होता. भारतात याची किंमत 12 लाख 79 हजार 500 रुपये आहे. मयुर मेहताने दिलेल्या माहितीनुसार रोमेल लॉरेन्स वाज, रमेश रघुनाथ पांडे, दीपक भोगीलाल कोठारी यांचा शोध घेउन त्यांना अटक करण्यात आली. या आरोपींना 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी सांगितले. हे ड्रग्ज इंदौर येथून विकण्यासाठी आणल्याचे तसेच या आरोपींचे गोळ्या बनविण्याचे एक युनिट अंधेरी येथे असून तिथे सुध्दा हे गोळ्या बनवण्याच काम करत होते. या ड्रग्जची व्याप्ती अजून वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास घोडके करत आहेत.