अकाेला : जुना कापड बाजारमध्ये असलेल्या अशाेकराज आंगडिया क्विक कुरिअर सर्व्हिसच्या कार्यालयातून बेहिशेबी असलेली १५ लाख ३५ हजार रुपयांची राेकड स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री जप्त केली. या राेकडचा हिशेब न देणाऱ्या व्यवस्थापकाविरुध्द सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशाेकराज आंगडिया क्विक सर्व्हिसचे संचालक निमेश इंद्रवर्धन ठक्कर यांच्या मालकीचे जुना कापड बाजारात कुरिअर सर्व्हिसचे कार्यालय असून या कार्यालयात बेहिशेबी, तसेच दस्तावेज नसलेले, मालकी हक्क नसलेले १५ लाख ३५ हजार रुपयांची राेकड असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी रात्री छापा टाकून ही राेकड ताब्यात घेतली. त्यानंतर येथील व्यवस्थापक अल्पेश हरिदास पलन (वय ४० वर्ष, रा. फडकेनगर, डाबकी राेड) याला १५ लाखांच्या रकमेबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिली. त्यानंतर पाेलिसांनी रकमेचा मालक काेण, १५ लाखांची राेकड काेठून आणली यासंदर्भात विचारणा केली असता त्याने काहीही उत्तर दिले नाही. त्यामुळे या राेकडबाबत संशय निर्माण झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने १५ लाख रुपयांची राेकड जप्त केली. त्यानंतर व्यवस्थापक अल्पेश हरिदास पलन याच्याविरुध्द ४५ (१) (४) जाफाे अन्वये सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख संतोष महल्ले, सहाय्यक पाेलीस निरीक्षक नितीन चव्हाण, पीएसआय गाेपाल जाधव, गोपीलाल मावळे, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, फिरोज खान, संदीप काटकर, शक्ती कांबळे, वीरेंद्र लाड, स्वप्निल खेडकर, लीलाधर गंडारे, अविनाश मावळे यांनी केली आहे.
मुख्य संचालक अलगद बाहेर
अशाेकराज आंगडिया क्विक कुरिअर सर्व्हिसच्या ज्या कार्यालयातून १५ लाख ३५ हजार रुपयांची राेकड जप्त केली त्या प्रकरणात केवळ व्यवस्थापकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या कुरिअरचा मुख्य संचालक निमेश ठक्कर यास अलगद बाहेर काढल्याने पाेलिसांनी अर्धवट कारवाई केल्याची चर्चा सध्या जाेरात सुरू आहे. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या प्रकरणात लक्ष दिल्यास आणखी माेठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.