नागपूर : बनावट नोटा छापून त्या चलनात आणणाऱ्या दोन भामट्यांना गुन्हे शाखा परिमंडळ दोनच्या पथकाने शनिवारी रात्री ताब्यात घेतले. निलेश राजू कडवे (वय २४, रा. समतानगर, कपिलनगर) आणि मारूफ खान रफीक खान (वय २४, रा. ताजनगर, टेका पाचपावली) अशी आरोपींची नावे आहेत.
या दोघांनी तीन महिन्यांपूर्वी मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकतानगर शिव मंदिर जवळ राहणारे संजय श्रीवास यांच्याकडे भाड्याने रूम घेतली. तेथे त्यांनी १००, ५०, २० आणि १० रुपयाच्या बनावट नोटा छापने सुरू केले. छोट्या किमतीच्या नोटा असल्यामुळे त्यांचा गोरखधंदा बिनबोभाट सुरू होता.
दरम्यान, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांना शनिवारी रात्री बनावट नोटाच्या कारखान्याची टीप मिळाली. त्यामुळे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपींकडे छापा घातला. यावेळी ते १००च्या बनावट नोटा छापताना आढळले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन कलर प्रिंटर आणि इंक टॅंक तसेच एका साईडने छापलेल्या शंभर, पन्नास, वीस आणि दहा रुपयांच्या बनावट चलनी नोटा, त्याचप्रमाणे शाईचे डब्बे, बॉटल, कटर मोजमाप पट्टी, मार्कर, पेन तसेच टेक असा एकूण १ लाख, २८ हजार, ३८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर दोघांच्याही घराची झडती घेण्यात आली. ही कारवाई रविवारी दुपारपर्यंत सुरू होती. त्यानंतर आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना आज न्यायालयात हजर करून त्यांचा ४ जून पर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहाय्यक आयुक्त नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांचे नेतृत्वात सहायक निरीक्षक परतेकी, उपनिरीक्षक संदीप काळे, लक्ष्मीछाया तांबुसकर, उपनिरीक्षक मोहेकर, झाडोकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
अनेक नोटा चलनातआरोपींनी गेल्या तीन महिन्यांत लाखोंच्या बनावट नोटा चलनात आणल्या आहेत.
चोरीचेही गुन्हे हे भामटे चोरटेही आहेत. त्यांनी गिट्टीखदान तसेच प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीचे गुन्हे केले असून प्राथमिक तपासात त्याची कबुलीही पोलिसांना दिली आहे.