नोएडा (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेश सरकारने गुन्हेगार आणि गुंडांवर कठोर कारवाई सुरू केली असून, गौतम बुद्धनगर पोलिसांनी कुख्यात गँगस्टर्स सुंदर भाटी आणि अनिल दुजाना व त्यांच्या सोबतच्या गुन्हेगारांच्या बेकायदा मालमत्तांवर टाच आणली. त्यात जमीन आणि कोट्यवधी रुपयांच्या आलिशान कार्सचा समावेश आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशावरून कारवाईचा हातोडा शनिवारी ग्रेटर नोएडात चालवला गेला. कानपूरमध्ये कुख्यात गुन्हेगार विकास दुबे याच्या टोळीतील लोकांनी आठ पोलिसांची हत्या केल्यानंतर ही कारवाई सुरू झाली. पोलीस आयुक्त आलोक सिंह यांनी जमीन आणि कार्स मिळून सात कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला. जलसाठ्याची जमीन या टोळक्याने बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवली होती. ती शनिवारी पुन्हा मिळवली गेली. बेकायदेशीररीत्या बांधलेले कुंपण तोडण्यात आले. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.गुन्हेगार, माफिया व गँगस्टर्सच्या कारवाया बंद करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता गँगस्टर्स कायद्याच्या कलम १४ (१) नुसार जप्त करता येतात. सेंट्रल नोएडाचे पोलीस उपायुक्त हरीश चंद्र यांनी सांगितले की, ‘‘अनिल दुजाना व त्याच्या टोळीचा सदस्य चंद्रपाल यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.दुसऱ्या एका टोळीचा सदस्य रॉबिन त्यागी याची पत्नी दिव्या संगवान हिच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. जप्त कार्समध्ये आॅडी आणि बीएमडब्ल्यूही आहेत.
नोएडात गुन्हेगारांच्या अनेक मालमत्ता जप्त, कानपूरमधील हत्याकांडांनंतर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 3:05 AM