औरंगाबाद : मटण विक्रीच्या व्यवसायाच्या स्पर्धेतून एकाच्या पोटात खोलवर सुरा भोसकून खून केल्याची घटना रविवारी सकाळी पिसादेवी रोडवर घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविला असून, तीन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.
अश्पाक युसूफ शहा (३५, रा. मिसारवाडी) असे मृत मटण विक्रेत्याचे नाव आहे. अब्दुल सलाम गुलाम कुरेशी, अब्दुल कलीम गुलाम कुरेशी आणि शाहेद गुलाम कुरेशी अशी पकडलेल्या तीन आरोपींची नावे आहेत. रहेमान गुलाम कुरेशी हा आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार मृत अश्पाकचे चिकन- मटणचे दुकान आहे. त्याच्या शेजारीच आरोपींचेही दुकान असून, त्यांच्यात स्पर्धेतून वाद होते. काही दिवसांपूर्वी अश्पाकने स्वस्त भावात विक्री करण्याची पाटीच दुकानासमोर लावली होती. त्यावरून धूसफूस सुरू होती. रविवारी सकाळी १० वाजता अश्पाक दुकानात आला, तेव्हा त्यास कमी दरात मटण विकायचे नाही, नसता तुझे दुकान बंद करीन, अशी धमकीच कुरेशी बंधूंनी दिली. त्यावरून वादाला तोंड फुटले. चौघांनी अश्पाकला मारहाण केली.
चौघांपैकी एकाने मटण कापण्याचा सुरा अश्पाकच्या पोट आणि छातीच्या मधोमध खुपसला, तेव्हा रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. हा घाव वर्मी लागल्यामुळे आणि खोलवर जखम गेल्यामुळे रक्ताचा सडा पडला. अश्पाक जमिनीवर कोसळताच आरोपी घरी निघून गेले. घटनास्थळावरील इतरांनी अश्पाकला घाटीत नेले. उपचार सुरू असताना दुपारी तीन वाजता त्याची प्राणज्योत मालवली. सिडको ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्यासह पोलिस उपायुक्त शिलवंत नांदेडकर, सहायक आयुक्त विशाल ढुमे पाटील आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सिडको ठाण्यात अश्पाकच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
घराला कुलूप लावून आरोपी पसार
अश्पाकचा खून केल्यानंतर चारही आरोपी घराला कुलूप लावून पसार झाले. तेव्हा निरीक्षक पवार यांनी विशेष पथकाचे उपनिरीक्षक अशोक अवचार यांना आरोपींना पकडण्याचे आदेश दिले. त्यानुसार आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज मिळवत उपनिरीक्षक अवचार, हवालदार सुभाष शेवाळे, लालखाँ पठाण, शिवाजी भोसले, प्रदीप दंडवते, किरण काळे यांच्या पथकाने दोन आरोपींना करमाडजवळील लाडगाव येथे पकडले. तिसऱ्याला रात्री उशिरा ताब्यात घेतले. एकाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
६५० रुपयांच्या दराचा वादमृत अश्पाक हा बकऱ्याचे मटण ६५० रुपये किलोने विक्री करीत होता. कुरेशी यांचा या दरास विरोध होता. कमी भावामुळे ग्राहक अश्पाकच्या दुकानाला पसंती देत होते. त्यातून कुरेशींच्या व्यवसायाला घरघर लागली होती. त्यातून अश्पाकला कायमचेच संपविण्यात आले.