डहाणू/बाेर्डी : डहाणू पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देना बॅंकेसमोरील एका घरात चोरी करण्याच्या इराद्याने एका वृद्ध व्यक्तीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जयप्रकाश पाेंदा (७०) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून, ते व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट हाेते. ते घरात एकटेच राहात हाेते. चाेरट्यांनी ताेंडावर उशी दाबून त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. शहरातील मुख्य बाजारपेठेलगत असलेल्या पोंदा यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यानंतर पाेंदा यांच्या तोंडावर उशी दाबून चोरट्यांनी त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. ते घरात एकटेच राहात हाेते. चोरांनी घरातील पाच कपाटे फोडली असून, सर्व सामान अस्ताव्यस्त केले हाेते. पोंदा यांच्या घरी काम करण्यासाठी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता माेलकरणी आल्या असता, हा प्रकार उघड झाला. त्यांनी ही माहिती जवळच असलेल्या रिक्षा स्टँडवरील डहाणू रिक्षा चालक- मालक युनियन संघटनेचे अध्यक्ष जयदेव पांडुरंग मर्द यांना दिली. मर्द यांनी डहाणू पोलिसांना घटनेची महिती दिली. त्यानंतर पाेलीस उपनिरीक्षक कांबळी यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी धनाजी नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले आहे. तसेच फिंगर प्रिंट तंत्राचा वापर करून चोरट्यांचा मागोवा घेतला जाणार आहे. या हत्येमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी डहाणूतील नागरिकांनी केली आहे.
चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी घरात प्रवेश करून हत्या केल्याचा प्रथमदर्शनी अंदाज आहे. मात्र, मयताचे नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतरच काय चोरीला गेले आहे, याविषयी समजेल. - धनाजी नलावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणू