नवी दिल्ली - हैदराबाद येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांचा मृतदेह जाळल्याच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर देखील देशात कुठे ना कुठे अशा घटना घडत आहेतच. उत्तर प्रदेशमध्ये अशाच प्रकारची एक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशमधील बहराइच येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिचा मृतदेह अॅसिडने जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. कातारनिया घाट जंगलात तरुणीचा मृतदेह सापडला आहे.उत्तरप्रदेशात एका तरुणीचा मृतदेह स्थानिकांना जळालेल्या अवस्थेत आढळला. उत्तरप्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील मुर्तिहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीचा मृतदेह आढळला आहे. मृतक तरुणीची अद्याप ओळख पटलेली नसून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.पोलिसांच्या प्राथमिक तपासणीनुसार या मुलीचे वय २० वर्षे असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मृतक मुलीचा चेहरा अॅसिडने जाळल्याचे दिसून येत आहे.अज्ञात आरोपींनी या तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केली असावी आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून जंगलात टाकून दिला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या तरुणीचा चेहरा अॅसिडमुळे पूर्णपणे जळालेला होता. तरुणीची ओळख लपविण्यासाठी तिचा चेहरा जाळण्यात आला. तर शरीरावरही अनेक ठिकाणी जळलेल्याच्या जखमा आहेत.