मुंबई - मीरा रोड येथील सेव्हन इलेव्हन या पंचतारांकित हॉटेलच्या व्यवस्थापनाला बुधवारी हॉटेल बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल 'लश्कर-ए-तोयबा' (आयएसआय) या दहशतवादी संघटनेच्या नावाने प्राप्त झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे हे हॉटेल असल्याची माहिती मिळत असून बुधवारी पहाटे ४ वाजता हा मेल आला. लष्कर - ए - तोयबाने हॉटेलच्या अधिकृत मेल आयडीवर धमकीचा ईमेल पाठवला आहे. या मेलमध्ये २४ तासांत १०० बिटकॉईन्स म्हणजेच 7 कोटी रुपये खात्यावर जमा करा, असे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे एटीएसचे प्रमुख देवेन भारती यांनी अन्य काही पंचतारांकित हॉटेलला देखील अशा प्रकारे खंडणी उकळणारे मेल आले आहेत. हे फेक ईमेल आयडी असावेत त्याचा आम्ही तपास करत असल्याची माहिती भारती यांनी दिली.
धमकीचा मेल मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेतली आणि संपूर्ण हॉटेल रिकामे केले. हॉटेलची कसून झाडाझडती घेतली गेली.श्वान पथक आणि एटीएसचे पथक देखील घटनास्थळी आले होते. हॉटेलचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून तपासणी केली असून सतर्क असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक शांताराम वळवी यांनी दिली आहे.