नवी दिल्ली - सेंट स्टिफन्स कॉलेजमधील एका प्राध्यापकाने आईची हत्या केली व त्यानंतर रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली.दिल्ली विद्यापीठातील सेंट स्टिफन्स महाविद्यालयातील प्रा. अॅलेन स्टॅनली (२७ ) यांचा मृतदेह सराय रोहिल्ला येथील रेल्वे रुळावर आढळून आला. प्रा. स्टॅनली तत्वज्ञानाचे अतिथी प्राध्याक होते. मूळचे केरळचे असलेले स्टॅनली पितमपुरा येथील आशियाना सोसायटीमध्ये वास्तव्याला होते. पोलिसांनी त्यांच्या घराची तपासणी केल्यानंतर तेथे त्यांची आई लिली(५५) मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला होता. त्यांचा मृतदेह पंख्याला लटकत होता. प्रा.अॅलेने स्टॅनली यांनी आईची हत्या करून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.
प्रा. स्टॅनली गेल्या पाच वर्षांपासून या महाविद्यालयात काम करीत होते. तसेच पीएच. डी. सुद्धा करीत होते. मल्याळम भाषेत लिहिलेली चिठ्ठी सदनिकेत आढळून आली आहे. राणीबाग पोलिसांनी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा या दोघांवर केरळमध्ये यापूर्वीच दाखल झालेला आहे. या संदर्भात त्यांनी मित्रांशी चर्चा केली होती. यावेळी असे टोकाचे पाऊल उचलू नये, असा सल्ला मित्रांनी स्टॅनली याला दिला होता. या खटल्यात ते दोघेही जामीनावर बाहेर असल्याची माहिती मित्रांना दिली होती.
गेल्य पाच वर्षापासून स्टॅनली दिल्ली राहत होता, तर सात महिन्यांपूर्व लिली स्टॅनली दिल्लीत आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या करावी, असे सुचविले होते. परंतु, लिली स्टॅनली यांनी मुलाचे म्हणणे ऐकले नाही. यामुळे अॅलेन स्टॅनली यांनी आईचा खून करून आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. ही घटना ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. नुकतेच त्याच्याबरोबर दिल्ली शिक्षक संघटनेविषयी बोलणे झाले होते. ते असे कृत्य करतील असे वाटले नव्हते, असे सेंट स्टिफन्स महाविद्यालयातील अॅलेनच्या सहकारी नंदिता नारायणने सांगितले आहे.