वाराणसीतील गुप्ता कुटुंबीय हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र गुप्ता, त्यांची पत्नी नीतू आणि तीन मुलांचा खून करणारा दुसरा कोणी नसून राजेंद्र यांचा मोठा पुतण्या विशाल उर्फ विकी आहे. ही संपूर्ण घटना विकीने एकट्याने घडवून आणली होती. सध्या तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर विकी पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करणाऱ्या वाराणसीच्या काशी झोनचे डीसीपी गौरव बन्सवाल यांनी 'आज तक'ला सांगितलं की, या हत्येसाठी एकच व्यक्ती जबाबदार असल्याचं समोर येत आहे, तो म्हणजे विकी. रोहनियामध्ये काका राजेंद्र यांची हत्या केल्यानंतर, विकी पहाटेच दुसऱ्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने राजेंद्र यांच्या कुटुंबातील उर्वरित चार सदस्यांची हत्या केली. यामध्ये त्यांची पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी होती.
या घटनेत इतर कोणाचा सहभाग आहे का या प्रश्नावर डीसीपी म्हणाले की, गुप्ता कुटुंबाचा इतिहास खूप हिंसक राहिला आहे. १९९७ मध्ये राजेंद्र यांनी जून महिन्यात आपल्या भावाची आणि वहिनीची तर डिसेंबरमध्ये वडिलांची आणि त्याच्या गार्डची हत्या केली होती. विकीने १९९७ मध्ये आई-वडिलांची हत्या करताना पाहिलं होतं. त्यामुळेच गेल्या दीड वर्षापासून विकी काकाच्या हत्येचा कट रचण्यात व्यस्त होता.
विकीच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विकीने कॉम्प्युटर ॲप्लिकेशन अर्थात एमसीएमध्ये मास्टर्स केले आहे आणि तो सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत होता. विकीच्या हालचालींची चौकशी केल्यानंतर असं आढळून आलं की, त्याने २२ ते २४ नोव्हेंबर दरम्यान अहमदाबादमध्ये आपला मोबाईल फोन बंद केला होता. यानंतर विकी बनारसला आला.
विकीचा लहान भाऊ प्रशांत उर्फ जुगनू याच्या चौकशीत असं समोर आलं की, विकी सुरुवातीपासूनच त्याचा काका राजेंद्र यांच्या विरोधात होता. राजेंद्र अनेकदा विकीला मारहाण करायचा. सध्या विकी जात असलेल्या सर्व ठिकाणांवर त्याला पकडण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. मित्र आणि नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.