नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-३ वर शुक्रवारी पहाटे संशयास्पद बॅग आढळल्याने खळबळ उडाली. संशयास्पद बॅग सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली असून विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांकडून विमानतळाची पाहणी करण्यात आल्याने प्रवाशांना रोखण्यात आले होते त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी टर्मिनल ३ वर गेट क्रमांक दोनजवळ पहाटे एक वाजता काळ्या रंगाची संशयास्पद बॅग आढळली. या बॅगेत आरडीएक्स असल्याचा सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आहे. पोलीस उपायुक्त संजय भाटीया म्हणाले की, सीआयएसएफच्या मदतीने बॅग सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली आहे. आतापर्यंत ही बॅग उघडण्यात आलेली नाही. विमानतळावरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
प्राथमिक चाचणीत बॅगेत स्फोटके असल्याची माहिती मिळाली. मात्र, त्याचा आकार स्पष्ट होत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सीआयएसएफचे विशेष महाअधिक्षक एम.ए. गणपती म्हणाले की, प्रत्यक्ष बॅग उघडल्यावरच खरी माहिती मिळेल. बॅगेत आरडीएक्स असल्याचे दावा करणे घाईचे ठरेल. दहशतवाद्यांकडून हल्ल्यांसाठी सर्रास आरडीएक्सचा वापर केला जातो. संशयास्पद बॅग आढळल्यामुळे प्रवाशांना बाहेर जाण्यापासून रोखण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, विमानतळाकडे जाणाऱ्या सर्वच मार्गांवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली असून काही मार्ग बंद करण्यात आल्याचे सीआयएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले. बॅग २४ तास निरीक्षण कक्षातपुढील २४ तास संशयास्पद बॅग निरीक्षण कक्षात ठेवली जाणार असल्याचे विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. अहवाल मिळाल्यानंतर याबाबत पुढील माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीआयएसएफ आणि दिल्लीपोलिसांनी संपूर्ण विमानतळाची पाहणी केली आहे. यावेळी सर्व मार्ग बंद करण्यात आले होते.