मीरारोड - भाईंदर पूर्व येथील एका दुकानात २२ वर्षीय प्रेयसीची गळा चिरुन हत्या केल्यानंतर स्वत:च्या गळ्यावर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न प्रियकराने केल्याची धक्कादायक घटना आज घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.तलाव मार्गावर असलेल्या बाळकृष्ण लिला इमारतीत चंदन आचार्य यांचे महालक्ष्मी डेअरी व जनरल स्टोर्सचे दुकान आहे. चंदन हा मुंबईला गेला असल्याने त्याचा भाऊ कुंदन आचार्य हा दुकानात होता. त्यावेळी समोरच्याच शालीभद्र इमारतीत राहणारी अंकिता रावल ही दुकानात आली. दुकानात दोघांचे भांडण झाले असता रागाच्या भरात कुंदन याने धारदार सुऱ्याने अंकिताचा गळा चिरला. नंतर त्याने स्वत:च्या गळ्यावर देखील सुरा फिरवला आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. कुंदन हा दुकानाच्या बाहेर पदपथावर येऊन रक्तबंबाळ अवस्थेत पडल्यानंतर लोकांच्या घडला प्रकार लक्षात आला. परंतु, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुंदनला कोणी हात लावायला तयार नव्हते. अखेर काही तरुणांनी त्याला नजिकच्या खाजगी रुग्णालयात नेले. या घटनेची माहिती कळताच उपअधिक्षक शशीकांत भोसले, नवघरचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अंकिताचा जागीच मृत्यू झाला होता. तर कुंदनच्या श्वासनलिकेला छेद गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले आहे. परंतु, कुंदनकडून पोलीसांना मिळालेल्या माहिती नुसार दोघांचे प्रेम संबंध होते. दोघांमध्ये भांडण झाल्याने त्याने अंकिताच्या गळ्यावर सुऱ्याने वार करून हत्या केली.गेल्या ५ ते ६ वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. लग्न करण्याचा अंकिता सतत आग्रह धरत होती. घरच्यांना या प्रेमप्रकरणाबद्दल कल्पना होती. परंतु, लग्नावरुन घरच्यांची संमती होत नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली असली तरी त्यांच्या निकटवर्तियांकडून यास दुजोरा मिळालेला नाही.
खळबळजनक! प्रेयसीची हत्या करुन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 19:43 IST
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खळबळजनक! प्रेयसीची हत्या करुन प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
ठळक मुद्देप्रेयसीची गळा चिरुन हत्या केल्यानंतर स्वत:च्या गळ्यावर वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्नदोघांमध्ये भांडण झाल्याने त्याने अंकिताच्या गळ्यावर सुऱ्याने वार करून हत्या केली.