उज्जैन - न्यायालयात खटला दाखल झाल्यावर वर्षांनुवर्षे चालणारे खटले ही आपल्या न्यायव्यवस्थेची ओळख. पण मध्य प्रदेशमधील एका ऩ्यायालयाने आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत आरोपीवर चार्जशिट दाखल करून नवा पायंडा पाडला आहे. एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अल्पवयीन आरोपीला बालन्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणी आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल झाले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याच दिवशी त्याला शिक्षा सुनावली. बलात्काराच्या कुठल्याही प्रकरणात सुनावण्यात आलेली ही सर्वात वेगवान शिक्षा आहे. घाटिया पोलीस ठाण्याचे प्रभारी एनएस कनेश यांनी सांगितले की, "पीडित मुलीचे कुटुंबीय 15 ऑगस्ट रोजी तिला आपल्या एका शेजाऱ्याच्या 14 वर्षीय मुलासोबत खेळण्यासाठी सोडून कामावर गेले होते. पण त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर हा मुलगा फरार झाला होता. अखेर 16 ऑगस्ट रोजी त्याला एका नातेवाईकाच्या घरातून अटक करण्यात आली."पोलिसांनीही या प्रकरणाचा वेगाने तपास केला. तसेच चार दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून सोमवारी न्यायमूर्ती तृप्ती पांडे यांच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायाधीशांनी काही तासांतच आपला निकाल सुनावला. आता अल्पवयीन आरोपीला सिवनी बालसुधारगृहात शिक्षा म्हणून दोन वर्षे राहावे लागेल.
एकाच दिवसात सुनावली बलात्काऱ्याला शिक्षा, न्यायालयाचा सुपरफास्ट निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 1:36 PM