पाटणा - कोरोनाकाळात माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समोर आली आहेत. काही दिवसांपूर्वीच एका खाजगी रुग्णालयातील ३ कर्मचाऱ्यांनी ४५ वर्षीय कोरोनाबाधित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेच्या मुलीकडून करण्यात आला आहे. या घटनेतील कोरोनाबाधित महिलेचा आता मृत्यू झाला आहे.
आईच्या मृत्यूनंतर पीडितेच्या मुलीने ही हत्या असल्याचा आरोप करत शास्त्रीनगर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या मुलीच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लक्षणं दिसू लागल्याने आईला १७ मेला खाजगी रुग्णालयात दाखल केले. आईची तब्येत ठणठणीत होती. त्यानंतर त्याचदिवशी खाजगी रुग्णालयाच्या तीन कर्मचाऱ्यांनी तिचे लैंगिक शोषण केले. याबाबत तिने मला माहिती दिली. त्यानंतर मी माझ्या नातेवाईकांना याबाबत कळवले. जन अधिकार पक्षाच्या महिला विंगला देखील तिने माहिती दिली. मात्र, नंतर आईचा मृत्यू झाल्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. रुग्णालयातील तीन अज्ञात कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण बिहारच्या पाटणामधील पारस रुग्णालयातील आहे.
मृत महिला अंगणवाडी सेविका होती आणि ती मुळची नालंदा जिल्ह्यातील रहिवासी होती. पीडितेच्या मुलीने पंधरा वर्षाआधीच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता असं सांगितले. रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. मुलीनं सांगितले, आई माझ्यासोबत पायी चालत रुग्णालयात आली होती, मात्र डॉक्टरांनी माझ्याकडून हे सांगून सही करुन घेतली की, आईची प्रकृती गंभीर आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. रुग्णालय प्रशासनाने महिलेचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे नमूद केले आहे. तसेच महिलेचे लैंगिक शोषण झाले होते यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन केले गेले आहे.