नवी दिल्ली: जीवावर उदार होऊन तब्बल 80 लाखांची रोकड चोरी होण्यापासून वाचवणाऱ्या नोकराला मालकाकडून मोठ्या बक्षीसाची अपेक्षा होती. मात्र मालकानं नोकराला त्याच्या निष्ठेचं आणि साहसाचं बक्षीस म्हणून फक्त एक टी-शर्ट दिलं. त्यामुळे नाराज झालेल्या नोकरानं मालकाचे 70 लाख रुपये लांबवण्याची योजना आखली. त्यात तो यशस्वीदेखील झाला. मात्र पोलिसांनी या चोरट्याला बेड्या ठोकल्या. 'आधी निष्ठावान आणि मग गद्दार' झालेल्या या नोकराची कहाणी सध्या नवी दिल्लीत चर्चेचा विषय ठरली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आझादपूरमधील एका कंपनीच्या मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या नोकराला अटक केली आहे. धान सिंह बिष्ट असं या नोकराचं नाव आहे. पोलिसांनी धान सिंहकडून 50 लाख रुपये आणि संपत्तीची कागदपत्रं जप्त केली आहेत. धान सिंहनं मालकाकडून लांबवलेल्या रकमेतून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली होती. त्या वस्तूदेखील पोलिसांनी हस्तगत केल्या. या चोरीसाठी धान सिंहला याकूब नावाच्या एका व्यक्तीनं मदत केली होती. त्याला पोलिसांनी आधीच अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी चार लाख रुपये जप्त केले आहेत. आझादपूरमधील एका कंपनीच्या मालकाकडे धान सिंह काम करायचा. त्याला मालकानं 27 ऑगस्टला 70 लाख रुपये आणण्यासाठी पाठवण्यात आलं होतं. ही रक्कम घेवून धान सिंह फरार झाला. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी धान सिंहच्या साथीदाराला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बुराडीमधून धान सिंहला बेड्या ठोकण्यात आल्या. धान सिंहनं काही महिन्यांपूर्वी जीवावर उदार होऊन मालकाचे 80 लाख रुपये वाचवले होते. मात्र त्यावेळी मालकानं त्याला फक्त एक टी-शर्ट गिफ्ट दिलं होतं. त्यामुळेच मालकाचे 70 लाख लांबवल्याची माहिती धान सिंहनं पोलिसांना दिली.
लाखो रुपयांची लूट रोखूनही मालकानं दिलं टी-शर्ट; नोकराची सटकली, अन्....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 3:05 PM