मुंबई : पुण्यातील वनवाडी पोलीस ठाण्याने पाच जणांविरोधात नोंदविलेला खंडणीचा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला. तक्रारदार व आरोपी यांनी सामंजस्याने तोडगा काढून प्रकरण मिटवले असले तरी उच्च न्यायालयाने आरोपी व तक्रारदाराला सहा महिन्यांसाठी वृद्धाश्रमात सेवा देण्याचे आदेश दिले आहेत.
पाच आरोपी २५ ते २९ या वयोगटातील आहेत. त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यापूर्वी ते आयटी सेक्टरमध्ये काम करत होते. मात्र, गुन्हा नोंदविल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढले. त्यांना दुसरीकडे नोकरीही मिळत नाही, अशी माहिती आरोपींचे वकील श्रीराम पिंगळे यांनी न्या. प्रसन्ना वराळे व न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठाला दिली. या पाचही जणांना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप होत आहे. तक्रारदारासोबत ज्या पद्धतीने वागले त्याचा त्यांना मनस्ताप होत आहे. गुन्हा रद्द करताना न्यायालय ज्या अटी घालेल त्या अटी आरोपी पाळतील, याची हमी ते द्यायला तयार आहेत, असे पिंगळे यांनी न्यायालयाला सांगितले.
पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये राहणारा ३० वर्षीय इसमाची पाच आरोपींशी ओळख झाली. त्यांनी त्याला ऑनलाइन सट्टेबाजी गेममध्ये सामील होण्यास प्रवृत्त केले. गुंतवलेल्या पैशांचा चांगला परतावा मिळेल, अशी हमी तक्रारदाराला दिली. त्यानुसार, तक्रारदाराने काही रक्कम गेममध्ये गुंतवली. त्यानंतर आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने गेममध्ये गुंतवलेले पैसे काढून घेतले. जीवाच्या भीतीने व पैसे गेल्याने तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार केली. वनवाडी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध अपहरण, खंडणी व अन्य काही गुन्हे नोंदविले. तक्रारदाराने गुन्हा रद्द करण्यासाठी दिलेली सहमती विचारात घेत न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरला. ‘याचिकाकर्ते तरुण आहेत, भूतकाळ विसरून करिअरला नव्याने सुरुवात करून आयुष्यात स्थिरावण्याचा विचार करत आहेत. त्यांची विनंती मान्य करत आहोत. पण आरोपी व तक्रारदाराला सदाशिव पेठेतील निवारा वृद्धाश्रमाला सेवा द्यावी लागेल, असे न्यायालयाने म्हटले.
दररोज तीन तास सेवा न्यायालयाने आरोपी व तक्रारदाराला सहा महिने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या रविवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत वृद्धाश्रमाला भेट देऊन तिथे सेवा देण्याचे आदेश दिले.