जळगाव : मेहुणबारे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडलेला ६० लाखाच्या गुटखा प्रकरणात मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन बेंद्रे यांच्यासह सात पोलीस कर्मचाऱ्यांना बुधवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे निलंबित केले आहे. ही माहिती मुंढे यांनी लोकमतला दिली.
यात एलसीबीच्या पाच, मेहुणबारे पोलीस स्टेशनचा एक व मुख्यालयाचा एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सचिन बेंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार नारायण पाटील, हवालदार रामचंद्र बोरसे, प्रवीण हिवराळे, महेश पाटील, मनोज दुसाने, मुख्यालयाचा नटवर जाधव व मेहुणबारे पोलीस ठाण्याचा रमेश पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
हे प्रकरण घडल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्याकडे चौकशी सोपविली होती. गोरे यांनी गेल्या आठवड्यात या सर्वांचे लेखी जबाब नोंदविले होते. हा चौकशी अहवाल बुधवारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे आला. त्यात ठपका ठेवण्यात आलेल्या सहायक निरीक्षक बेंद्रे यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. काय आहे प्रकरणसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडे सात वाजता चाळीसगाव-मेहुणबारे रस्त्यावरील गिरणा नदीच्या पुलावर ५७ लाख रुपये किमतीचा गुटख्याचा ट्रक (क्र.एम.एच.१८ एम.०५५३) पकडण्यात आला होता. तोडीपाणी करुन हा ट्रक पोलिसांनी सोडून दिल्याचा आरोप चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला होता. या प्रकरणात ट्रक चालक मसूद अहमद शब्बीर अहमद (३८) व क्लिनर मोहम्मद अय्युब दिन मोहम्मद (५०) दोन्ही रा. मालेगाव यांना अटक केली होती.
गुटखा प्रकरणात सहभाग घेतलेल्या मेहुणबारे अधिकारी, कर्मचारी तसेच एलसीबीच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. चौकशीत ते दोषी आढळून आले आहेत. चुकीचे काम करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही.-डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक