वाशिम : मानोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २६ मे रोजी काही युवकांनी केलेल्या चाकुहल्ल्यात एक जण ठार तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणात सुरूवातीला दोन आरोपींला अटक केल्यानंतर, २८ मे रोजी आणखी सात आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींची संख्या नऊ झाली असून यात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे.
फिर्यादी अनंता साहेबराव कुडवे (वय २०) रा. बेलोरा यांच्या तक्रारीनुसार, मामेबहिणीला त्रास देणाऱ्या युवकाला जाब विचारला असता, त्याने इतरांच्या मदतीने मानोरा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात २६ मे रोजी शिवदास उघडे व राहुल चव्हाण यांच्या पोटावर, छातीवर चाकूने सपासप वार केले होते. यामध्ये शिवदासचा मृत्यू झाला तर राहुल याच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी जलदगतीने तपासाची चक्रे फिरवित २६ मे रोजी सहा जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. पहिल्या दिवशी श्रीकांत दावणे, आकाश अगलदरे यांना पोलिसांनी अटक केली होती. अटक आरोपी, सीसीटीव्ही फुटेज व गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, चाकूहल्ला प्रकरणातील अन्य आरोपी हे मानकिन्ही येथील जंगल शिवारात लपून बसल्याचे समोर आले. यावरून सापळा रचून २८ मे रोजी अविनाश संतोष दावणे रा. मागकिन्ही याच्यासह अन्य दोन अल्पवयीन आरोपींना जंगल शिवारातून ताब्यात घेतले. या आरोपींना विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपी अविनाश उर्फ शुभम गोविंदा अगलदरे रा. गोरेगाव यास कारंजा येथील स्वप्नील अशोक काळे याने मोटारसायकलवरून पळवून लावण्यास मदत केल्याचे सांगितले. यावरून स्वप्नील काळे यास शिवाजी नगर कारंजा येथून ताब्यात घेतले. तसेच कुणाल भगवान अघम व भारत संतोष अंभोरे या आरोपींनाही ताब्यात घेतले.
मुख्य आरोपीला मूर्तिजापूरात पकडले
चाकूहल्ला प्रकरणात अटक केलेल्या इतर आरोपींकडून मुख्य आरोपीचे नाव तपासातून समोर आले. मुख्य आरोपी अविनाश उर्फ शुभम गोविंदा अगलदरे, रा.गोरेगाव हा मुर्तीजापुर येथील हतगाव जिनिंग येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून २८ मे रोजी पोलिस चमूने मूर्तिजापूर गाठले आणि मुख्य आरोपीला जेरबंद केले.