शेखर पानसरे
संगमनेर : संगमनेर बसस्थानकातून सात तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना रविवारी (दि. ७) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी सोमवारी (दि. २२) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात ७१ वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पंढरीनाथ कारभारी लगड (वय ७१, रा. पिंपळगाव नाकविंदा, ता. अकोले, हल्ली रा. सुभाषनगर, चाळ क्रमांक १, खोली क्रमांक ११, आदरवाडी रस्ता, कल्याण पश्चिम, जि. ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला.
सोन्याचे दागिन्यांची चोरी झाल्यानंतर लगड हे रविवारी (दि. ७) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी बद्रीनाथ लोहे यांचीही सोन्याची चैन संगमनेर बसस्थानकातून चोरीला गेल्याची तक्रार सुरु होती. त्यावेळी लगड यांच्या पत्नी खूप घाबरल्या होत्या. त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे त्यांना घरी नेण्यात आले. सोमवारी (दि. २२) लगड यांनी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. ५५ हजार रुपये किमतीचे पाच तोळ्याचे सोन्याचे गंठन, २० हजार रुपये किमतीचे दोन तोळे माण्यांची पोत असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हेड कॉस्टेबल ए. बी. धनवट अधिक तपास करीत आहेत.