लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी येथे बंद असलेल्या एसआरए प्रकल्पाच्या जागेत मंडप बांधून सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या रझिक मेहबूब खान या सात वर्षीय मुलाचा लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाला आणि विवाह सोहळ्याचे शोकात रुपांतर झाले.
गिल्बर्ट हिल येथील एसआरएचा प्रकल्प असलेल्या इमारतीची ही साईट गेल्या दहा ते बारा वर्षांपासून बंद आहे. याच जागेत मंडप बांधून विवाह सोहळा सुरू होता. रझिक मेहबूब खान हा त्याच्या पालकांसोबत रिसेप्शनसाठी आला होता. इतर मुलांसोबत खेळता खेळता रझिक गायब झाला. रिसेप्शनमध्ये व्यस्त असलेल्या कुटुंबीयांच्या लक्षात ही बाब आली तेव्हा खूप उशीर झाला होता. त्याचे वडील मेहबूब, काका इक्बाल आणि समशेर यांनी त्याला शोधायला सुरुवात केली. पण तो कुठेच सापडला नाही. काही वेळाने लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात रझिकची चप्पल तरंगताना दिसल्याने समशेर पाण्यात उतरले तेव्हा त्यांना रझिकचा मृतदेह सापडला. तो पाण्यात कसा पडला? हे साेबतच्या मुलांना माहीत नव्हते’, असे इक्बाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अद्याप त्याचा शवविच्छेदन अहवाल मिळालेला नसून याप्रकरणी डी. एन. नगर पोलीस तपास करत आहेत.
वर्षातील दुसरी घटना!
सात महिन्यापूंर्वीही अशाचप्रकारे चार वर्षीय मुलाचा या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे सुरक्षेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या एसआरएच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.