गोंदिया - तालुक्याच्या खातीया येथील १९ वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष देऊन तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या तरूणाला जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा आज सुनावली. सुनीलकुमार रमेश बोहरे (२६) रा. खातीया असे आरोपीचे नाव आहे.
सुनील बोहरे याने गावातीलच १९ वर्षाच्या तरूणीवर सन २०१२ एप्रिल महिन्यात तिनशे रुपये देऊन तिच्यावर बळजबरी केली. या बळजबरीतून ती तरूणी गर्भवती झाली. ती ७ महिन्याची गर्भवती झाल्यानंतर त्याला लग्नासंदर्भात विचारणा केली असता त्याने तिला लग्नास नकार दिला. त्यानंतर त्या पिडीतेने १३ डिसेंबर २०१२ ला पोलिसात तक्रार केली. रावणवाडी पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३७६, ५०६ ब अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्या पिडीतेने १० जानेवारी २०१३ ला एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्या मुलीचे डीएनए चाचणी झाल्यावर ती सुनीलकुमार याचीच मुलगी असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पैलकर यांनी केला. या प्रकरणात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश १ माधुरी आनंद यांनी सुनावणी करताना आरोपी सुनीलकुमार बोहरे याला कलम ३७६ अन्वये ७ वर्षाचा सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड, कलम ५०६ ब अंतर्गत ५ वर्षाचा कारावास व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पिडीतेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून सुरूवातीला अॅड. कैलाश खंडेलवाल व अॅड. पुरूषोत्तम आगाशे यांनी काम केले.न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस निरीक्षक आनंदराव मेश्राम यांनी काम पाहिले.