- दत्ता यादव
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : न बोलणाऱ्याचं सोन पण विकलं जात नाही. तर बोलणाऱ्याचा दगडही विकला जातो, अशी एक प्रचलित म्हणं आहे. या म्हणीचाच प्रत्यय सध्या साताऱ्यातील पोलिसांना अनुभवयास येत आहे. दहावी व सातवी नापास असलेल्या दोघा भामट्यांनी केवळ चांगल्या वक्वृत्वाच्या जोरावर पदवीधर व उच्चशिक्षित असलेल्या तरूणांना चक्क सरकारी नोकरी लावतो, अस आमिष दाखविलं, हे दोघे अल्पशिक्षित असूनही त्यांनी ज्या प्रकारे उच्चशिक्षित तरूणांना गंडवलं, ते पाहून साताऱ्यातील पोलीस अक्षरश: चक्रावून गेलेत.
मारूती जयवंत साळुंखे (वय ४२, रा. नरोटवाडी, ता. इंदापूर, जि, पुणे, मूळ रा, बनपुरी, ता, आटपाडी, जि, सांगली), प्रवीण राजाराम येवले (वय ३४, रा. येवले, वडी, पोस्ट कळंबी, ता. खटाव, जि. सातारा) अशी उच्चशिक्षित तरूणांना गंडा घालणाऱ्या या अल्पशिक्षितांची नावे आहेत. मारूती साळुंखे याचे सातवी तर प्रवीण येवले याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. साताऱ्यातील एमआयडीसीमध्ये हेदोघे नोकरी करत होते. मात्र, सात आणि आठ हजारांत घरखर्च भागवताना दोघांचेही नाकेनऊ येऊ लागले. त्यामुळे काही तरी केलं पाहिजं, अस सारखं त्यांना वाटू लागलं. अशातच त्यांच्या डोक्यात एकभन्नाट कल्पना सूचली. आपण सरकारी नोकरी लावू शकतो, असं सांगून पैसे उकळायचे. अस दोघांच ठरलं. फसवणुकीची सुरूवात त्यांनी स्वत:च्या गावातूनच केली. गावात पदवीधर असलेले बरेच युवक या दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू लागले. या दोघांची साधी राहणीमान, पण विचारसरणी बोलघेवडी. त्यामुळे पटकन उच्चशिक्षित तरूणांचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते कोल्हापूरच्या तहसील कार्यालयापर्यंत आपली चांगली ओळख आणि उठबस असल्याचे त्यांनी तरूणांना सांगितलं. कोणाला शिपार्इ म्हणून तर कोणाला लिपिक तर कोणाला तहसीलदारांचा चालक बनविण्याचं त्यांनी तरूणांपुढं जाळ फेकलं.
गेल्या तीन वर्षांपासून या दोघांनी उजळमाथाने तरूणांची फसवणूक सुरू केली. कोणाला शंका येऊ नये म्हणून त्यांनी अनेक चाली खेळल्या. दोघे एकत्र कधीच भेटायचे नाहीत. मारूती साळुंखे तरूणांसमक्ष फोन करायचा. तो फोन प्रवीण येवलेला लावायचा. पणभासवायचा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यासंमवेतबोलल्याचा. येवले पलीकडून फोनवर जणू काय अधिकारी असल्याच्या आवेशात बोलायचा. त्यामुळे उच्चशिक्षित तरूणांना विश्वास बसायचा. असे करत या दोघांनी एक दोन नव्हे तर तब्बल १८ उच्चशिक्षित तरूणांना गंडवलं. कोणाकडून २० हजार तर कोणाकडून ३० हजार असे उकळत ही रक्कम १५ लाखांकडे गेली.
हे पहा फसगत झालेल्या तरूणांचे शिक्षण...
फसवणूक झालेल्या युवकांमध्ये कोणी बीए, एमकाॅम, बीएड, बीएससी, आयटीआय, बारावी असे शिक्षण झालेले तरूण आहेत. या तरूणांनीशहानिशा न करता व चिकित्सपणे न पाहाता केवळ बोलण्यावर विश्वास ठेवून वडिलांनी साठवलेली पुंजी या भामट्यांच्या हवाली केली. याचा पश्चाताप आता या तरूणांना झालाय.
पैसे घालवले चैनीवर
हे दोघे सध्या पोलिसांच्या कोठडीत असून, या दोघांनी सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यातील तरूणांना आपल्या जाळ्यात ओढलंय, तरूणांकडून घेतलेले पैसे त्यांनी चैनीवारी घालवलेत. आता हे पैसे वसूल कसे करायचे, असा प्रश्न पोलिसांना पडलाय.