प्रयागराज : अलाहाबाद हायकोर्टाने म्हटले की एखाद्या व्यक्तीच्या डेटिंग साईटवर अॅक्टिव्ह असण्याच्या आधारे त्याची नैतिकता ठरविता येणार नाही. ही टिप्पणी उच्च न्यायालायने बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अटकपूर्व जामिन अर्जावर सुनावणीवेळी त्याच्या वकीलाने केलेल्या युक्तीवादावर केली आहे.
पीडिता आरोपीच्या एका डेटिंग साईटवरून संपर्कात आली आणि चौथ्या दिवशीच त्यांच्यात शरीर संबंध बनले. चौथ्या दिवशी ती त्याला भेटण्यासाठी निघाली हे तिची नैतिकता दर्शविते, असे आरोपीच्या वकिलाने म्हटले. न्यायालयाने हा युक्तीवाद अमान्य करत आरोपीचा जामिन फेटाळला. पी़डितेने आरोपीच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल केला होता. आरोपी आणि पीडिता एका डेटिंग साईटमुळे एकत्र आले होते. डेटिंग साईटवर ओळख झाल्यावर दोघांमध्ये चार दिवसांमध्येच जवळीक वाढली. एकमेकांना भेटले, शारीरिक संबंध ठेवले. यासाठी त्या तरुणाने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखविले. मात्र, नंतर त्याने लग्न करण्याचे टाळले.
केस दाखल होताच अटक होण्यापासून वाचण्यासाठी आरोपी अभय चोप्रा याने हाय कोर्टात जामिनासाठी अर्ज केला. यावेळी आरोपीच्या वकिलांनी दोन्ही व्यक्ती चार दिवसांतच शरीरसंबंध ठेवतात, म्हणजे परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवल्याचा प्रकार आहे. यामुळे बलात्कार होत नाही, असा युक्तीवाद केला. चोप्रा याने तिला लग्न करण्याचे कोणतेही आमिष दिले नव्हते, असे म्हटले. यावर न्यायालयाने वरील टिप्पणी करत चोप्राचा अटकपूर्व जामिन फेटाळला. आरोपीने पोलिसांकडे समर्पण करावे आणि संबंधित न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा असे कोर्टाने म्हटले.