लग्नाचे वचन देऊन ठेवण्यात आलेले शरीर संबंध सरसकटपणे बलात्कार मानले जाऊ नयेत’, असं दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या एका सुनावणीत निरीक्षण नोंदवले आहे. ‘जर एखादी महिला आपल्या मर्जीने खूप काळ शरीर संबंध ठेवत असेल तर तो बलात्कार नाही’, असे दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
बऱ्याच कालावधीपर्यंत एका व्यक्तीबरोबर शरीर संबंध ठेवल्यानंतर एका महिलेने त्या व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालय सुनावणी करत असताना हे महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. या प्रकरणी ही याचिका फेटाळत उच्च न्यायालयाने म्हटले की, ‘जर दोघांमधील शरीरसंबंध खूप काळ असतील तर केवळ लग्नाचं वचन देऊन ते ठेवण्यात आले म्हणून त्याला बलात्कार म्हणता येणार नाही’.
‘काही प्रकरणांमध्ये लग्नाचं वचन हे शरीर संबंधांच्या लालसेपोटी दिलेलं असू शकतं. मात्र, महिलेची इच्छा नसल्याने अशा प्रकरणांमध्ये महिला एखाद वेळेसच पूर्ण संमतीने शरीर संबंधांसाठी होकार देते. पण जेव्हा प्रियकराचा खोटेपणा तिच्या लक्षात येतो तेव्हा ती आपली संमती नसल्याचंही स्पष्ट करते. त्यामुळे महिलेला लग्नाचं अमिष दाखवून शरीरसंबंधासाठी तयार करणं म्हणजे महिलेच्या सहमतीचा दुरुपयोग करणं आहे. त्यामुळे केवळ अशा मर्जी विरोधात ठेवण्यात आलेल्या शरीर संबंधांच्या प्रकरणांमध्ये भारतीय दंड विधान सेक्शन 375 अंतर्गत बलात्काराची शिक्षा होऊ शकते’, असं न्यायालयाने नमूद केले आहे.
न्यायमूर्ती विभू बाखरू यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. खूप काळापर्यंत एकत्र असलेल्या प्रेमीयुगुलात शरीरसंबंध होते. लग्नासाठीचं वचनही तिच्या जोडीदाराकडून महिलेला देण्यात आलं होतं. मात्र नंतर हे नातं संपुष्टात आल्यानंतर त्या महिलेने बलात्काराची तक्रार केली. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.