MP मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश: शिवसेना महिला नेत्यासह १० जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 03:59 PM2021-11-08T15:59:07+5:302021-11-08T15:59:57+5:30
पोलिसांना एक टीप मिळाली आणि त्यानंतर त्यांनी अनुपमा तिवारी यांच्या घरावर छापेमारी केली.
मध्य प्रदेशातील सीहोर इथं शिवसेना नेत्याच्या घरी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन रोख रक्कम आणि २ कार जप्त केली आहे. या सेक्स रॅकेटमध्ये ५ मुली, ५ ग्राहकांसह महिला मॅनेजर आणि चालकाला अटक करण्यात आली आहे. ज्या महिलेवर ही कारवाई करण्यात आली आहे ती स्वत:ला समाजसेविका असल्याचं सांगते. त्याचसोबत शिवसेनेच्या तिकीटावर नगरपालिकेची निवडणूकही तिने लढवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना एक टीप मिळाली आणि त्यानंतर त्यांनी अनुपमा तिवारी यांच्या घरावर छापेमारी केली. त्याठिकाणी सेक्स रॅकेट सुरु असल्याचं दिसून आले. छापेमारीवेळी पोलिसांनी घेतलेल्या सीक्रेट ऑपरेशनमुळे कुणालाही तिथून पळता आलं नाही. पोलिसांनी ५ मुली आणि ५ ग्राहकांना पकडलं. घटनास्थळी पोलिसांना नशेचं सामानंही मिळालं. या सर्व मुली भोपाळच्या असल्याचं सांगितलं जातं. इंदुलता नावाची महिला मॅनेजर त्यांना घेऊन येत होती.
कोण आहे अनुपमा तिवारी?
अनुपमा तिवारी ही समाजसेविका असल्याचं सांगते. २०१५ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर तिने नगरपालिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. नेहरु युवा केंद्राकडून काही वर्षापूर्वी योगाचार्य म्हणून तिचा सन्मान केला होता. महिलांच्या सुरक्षेसाठी नेहमी अनुपमा तिवारी समोर येऊन विधानं करत होत्या. पोलिसांनी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घरातून २८ हजारांची रोकड आणि कार जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी पकडलेल्या मुलींना भोपाळमधून आणलं होतं. महिला मॅनेजर इंदुलता या मुलींना घेऊन रुमवर यायची. प्रत्येक ग्राहकाकडून ५०० रुपये वसुली करण्यात यायची. अनुपमा मूळची होशंगाबाद येथील रहिवासी आहे. सीहोर हे तिचं सासर आहे. ३ महिन्यापूर्वीच ती इंदूरमधून परतली होती. अनुपमा तिवारीच्या पतीचं २०१८ मध्ये निधन झालं होतं. दारुबंदीविरोधातही अनुपमा मोहिम चालवायची. २०१५ निवडणुकीत अवघे ६९४ मते तिला मिळाली होती. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत. ज्यात आणखी खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आरोपींची कसून चौकशी सुरू आहे आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितले.