चेन्नई - एका बनावट NCC शिबिरात १३ मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले. या प्रकरणी कृष्णागिरी जिल्ह्यातील एका खासगी शाळेचे मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांसह ११ जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती तामिळनाडू पोलिसांनी दिली. हे शिबीर शाळेच्या परिसरात आयोजित केले होते. त्यामुळे पोलिसांनी आयोजकांनाही अटक केली आहे.
कृष्णागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी थंगादुरई यांनी सांगितले की, शाळेत बनावट एनसीसी शिबिराचं आयोजन करून त्यात जवळपास १३ मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले. शाळेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना या गोष्टीची कल्पना असूनही त्यांनी सदर बाब पोलिसांपासून लपवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर आहे. एका खासगी शाळेत हा कॅम्प लावण्यात आला होता. त्याठिकाणी एनसीसी यूनिटही नव्हते असं तपासात पुढे आले.
माहितीनुसार, ५ वी ते ७ वी पर्यंतच्या मुलांसाठी एनसीसी कॅम्प लावला होता. एका गटाने शाळेशी संपर्क साधला तेव्हा शिबिरानंतर शाळेत एनसीसी यूनिट स्थापन होऊ शकते असं आश्वासन देण्यात आले. शाळेचीही त्याला परवानगी होती. प्रस्ताव मंजूर होण्याआधी कुठलीही चौकशी करण्यात आली नसल्याचं पोलिसांनी सांगितले. ३ दिवसीय शिबीर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले होते. त्यात ४१ जण सहभागी होते त्यातील १७ मुली होत्या. मुलींना आमिष दाखवून त्यांना बहाण्याने फसवण्यात आले आणि लैंगिक शोषण करण्यात आले.
सेमिनार हॉलमध्ये सर्वांना थांबवलं होतं...
मुलींना पहिल्या मजल्यावरील सभागृहात थांबवले होते तर मुलांची तळमजल्यावर राहण्याची व्यवस्था होती. मुलांवर देखरेख ठेवण्यासाठी कुणीही शिक्षक नव्हते. आरोपींवर लैंगिक शोषणासोबत अनेक कलमे लावण्यात आली आहेत. जिल्हा बालकल्याण समितीनं शाळेतील अधिकारी आणि शिबीर आयोजकांवर कारवाई सुरू केली आहे. बनावटपणे एनसीसी शिबीर आयोजित करून अन्य शाळेतही असे प्रकार घडलेत का याचा पोलीस शोध घेत आहे.
प्रकरण 'असं' उघड झालं
NCC कॅम्पमध्ये भाग घेतलेली १२ वर्षीय मुलगी १६ ऑगस्टला आजारी पडली. जेव्हा तिच्या आई वडिलांनी चौकशी केली तेव्हा तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितला. ८-९ ऑगस्टच्या मध्यरात्री ३ वाजता शिवरामन नावाचा युवक ज्याने कॅम्पमध्ये भाग घेतला होता त्याने तिला उठवलं. मला निर्जनस्थळी घेऊन जात लैंगिक शोषण केले असं मुलीने सांगितले त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. त्यात १३ मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचं उघड झाले.