कल्याण - चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील एका शाळेच्या हॉस्टेलमधील आदिवासी मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदन आदिवासी परधान महिला विकास मंडळ यांच्यावतीने कोळसेवाडी पोलिसांना बुधवारी देण्यात आले.
मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा वंदना कुडमते यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी समाजाच्या अस्मितेला धोका निर्माण झाला असून रोज काही ना काही नवनवीन संकटांना समोरे जावे लागत आहे. राजुरा येथील वसतिगृहात आदिवासी मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणा-यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच, शिक्षण विस्तार अधिकारी, निरीक्षक यांनी आपली कर्तव्ये पार पाडली आहेत का याचीसुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अशा मागण्यांचे पत्र कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांना देण्यात आले. यावेळी, सहसचिव उषा कोवे, कोषाध्यक्षा स्नेहा मडावी, सहकोषाध्यक्षा ज्योती गेडाम, प्रतिभा मडावी, दुर्गा मसराम, ज्योती कुडमेथे, आरती नागभीडकर, सुनंदा मडवी, ज्योती मसराम, शोभा गेडाम, यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या.