नरेश डोंगरेनागपूर : येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या एका तृतीयपंथीयाचा लैंगिक छळ करून विनयभंग केल्याच्या आरोपाखाली कारागृहाचे पाच अधिकारी, दोन कर्मचारी आणि दोन अट्टल गुन्हेगार अशा नऊ जणांविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री गुन्हा दाखल केला. या घडामोडींमुळे राज्याच्या कारागृह प्रशासनात भूकंप येण्याचे संकेत मिळाले आहेत. नागपूर शहरात तृतीयपंथीयांचे दोन मोठे गट आहेत. वर्चस्वाच्या वादातून त्यांच्यात नेहमी खटके उडायचे. त्यातून ४ जून २०१९ ला तृतीयपंथी चमचम गजभिये हिची दुसऱ्या गटाचा म्होरक्या सपन उर्फ उत्तम बाबा सेनापती आणि त्याच्या साथीदारांनी निर्घुण हत्या केली होती. पोलिसांनी अटक केल्यापासून उत्तम बाबा येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे.
या कारागृहात गेल्या दोन वर्षात तुरुंगाधिकारी, कर्मचारी आणि अट्टल गुन्हेगार यांनी अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची ओरड वजा तक्रार उत्तमने केली होती. कारागृह प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे त्याने जिल्हा न्यायाधीश यांना काही दिवसांपूर्वी पत्र लिहिले. या पत्राची न्यायालयाने गंभीर दखल घेतली आणि कारागृह अधीक्षकांना उत्तमला तक्रार नोंदवण्यासाठी धंतोली पोलीस ठाण्यात नेण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, गुरुवारी सायंकाळी कारागृह प्रशासनाने उत्तम बाबाला धंतोली पोलीस ठाण्यात नेले. त्याची तक्रार ऐकून घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची आधी वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यानंतर जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू झाली. ती रात्री ११.३० पर्यंत चालली. शेवटी मध्यरात्री या प्रकरणात कलम ३७७ ( अनैसर्गिक अत्याचार) आणि ३५४ (विनयभंग) नुसार वरिष्ठ तुरुंगाधिकारी कांदे, तुरुंगाधिकारी भोसले, तुरुंगाधिकारी काळपांडे, तुरुंगाधिकारी नाईक तसेच तुरुंग कर्मचारी वानखेडे आणि अन्य एक या सात जणांसह कुख्यात गुन्हेगार दर्शनसिंग कपूर आणि मुकेश यादव अशा एकूण नऊ जणांविरुद्ध धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रात्री ११.४५ ला गुन्हा दाखल झाल्याची माहिती उशिरा रात्री धंतोलीचे ठाणेदार लांडगे यांनी लोकमतला दिली.वादग्रस्त घटना आणि वेळोवेळी चर्चानागपूरचे मध्यवर्ती कारागृह गेल्या काही वर्षात अनेकदा वेगवेगळ्या वादग्रस्त घटनांमुळे चर्चेला आले आहे. कारागृहात कैद्यांना मटन, दारू, गांजा, पत्ते पुरविले जात असल्याचा खुलासा एका व्हिडिओच्या माध्यमातून लोकमतने केला होता. त्यामुळे राज्यभर खळबळ उडाली होती. सरकारने त्याची गंभीर दखल घेत तत्कालीन कारागृह अधिकाऱ्यांना वठणीवर आणून हे प्रकार बंद केले होते. या घटनेनंतर अटल गुन्हेगारांनी पहाटेच्या वेळी कारागृहातून पलायन करून देशभर खळबळ उडवून दिली होती.
या घटनेनंतर एका गुन्हेगाराची दुसऱ्या एका गुन्हेगाराने कारागृहात हत्या केली होती. या घटनांमुळे मध्यवर्ती कारागृहातील भोंगळ कारभार सर्वत्र चर्चा आणि टीकेचा विषय ठरला होता. त्यामुळे राज्य कारागृह प्रशासनाने येथे कर्तव्यकठोर अधिकारी योगेश देसाई आणि त्यानंतर अनुप कुमार कुंमरे यांना नेमले. कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेण्याबाबतच्या कडक उपाययोजना करण्याचेही आदेश दिले. परिणामी गेल्या ४ वर्षात येथील कारभार सुरळीत होता. मात्र आता कारागृहाच्या पाच अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांवर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे पुन्हा एकदा नागपूरचे मध्यवर्ती कारागृह चर्चेला आले आहे.