क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीच्या अटकेत असलेल्या आर्यन खानसह आठ जणांच्या न्यायालयीन कोठडीत सत्र न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. मुंबई क्रूझ ड्रग प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून अटकेत आहे. आज या प्रकरणी आज एनसीबीच्या पथकानं शाहरुख खानच्या राहत्या घरी मन्नत या बंगल्यावर छापा टाकला, अशी माहिती माध्यमांत पसरली होती. परंतु, एनसीबीकडून समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण देत शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचं पथक शाहरुख खानच्या घरी गेलं होतं, अशी माहिती दिली आहे.
आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास सुपरस्टार शाहरुख खानने आर्थर रोड तुरुंगात जाऊन मुलगा आर्यन खानची १० मिनिटं भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच एनसीबीच्या पथकाकडून अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरीही शोधमोहीम राबवण्यात आली. तसेच तिला समन्स बजावून दुपारी 2 वाजता अनन्या पांडेला चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्यासह एनसीबी कार्यालयात पोहचली.
दरम्यान एनसीबीच्या या कारवाईबाबत प्रसिद्धी माध्यमांमध्ये शाहरुखच्या मन्नत या बंगल्यावर छापा टाकल्याची माहिती प्रसारित झाली होती. मात्र, कोणताही छापा टाकला नसून केवळ आर्यन खानसंबंधित काही कागदपत्रं गोळा करण्यासाठी मन्नतवर एनसीबीचे पथक गेल्याची माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी दिली.