मुंबईतील नागपाडा परिसरात एका अंध मुलीवर तिच्याच नातेवाईकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कुटुंबातील कलहातून त्या नातेवाईकाने पुन्हा अत्याचार करण्याची धमकी दिली. नंतर पीडित मुलगी मानसिकदृष्ट्या हतबल झाली होती. त्यावेळी मानसोपचार तज्ञांनी केलेल्या चौकशीत तिने सात वर्षापूर्वी नातेवाईकाने केलेल्या अत्याचाराची माहिती उघड झाली. ही माहिती मुलीच्या घरी दिल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात मुलीची वहिनी, वहिनीचा भाऊ आणि त्याचा मित्र अशा तिघांविरोधात पॉक्सोसह भा.दं.वि. कलम ३७६(एल), ५०६, ५०४, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी न्यायालयात एका सुनावणीदरम्यान आरोपींनी पुन्हा मुलीची वाट अडवून मुलीला २०१३ प्रमाणे आताही लैंगिक अत्याचार करण्याबाबत धमकावले होते. इतकेच नव्हे तर दोघांनी मुलीच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन पीडित मुलगी स्वतःला मारून घेऊ लागली, स्वतःचे केस उपटू लागली, अशा प्रकारे स्वतःला इजा करून घेऊ लागली. कुटुंबियांनी अखेर मुलीला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेले. त्यावेळी २०१३ मध्ये तिच्यावर वहिनीचा भाऊ व एका मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली.
त्यात तिच्या वहिनेनी देखील दोन आरोपींना मदत केल्याचा आरोप केला आहे. आरोपींनी तिला मारहाण करत धमकावल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी पीडित मुलीची वहिनी, तिचा भाऊ व भावाचा मित्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नागपाडा परिसरात पीडित मुलगी तिचे आई वडिल, भाऊ आणि बहिणीसोबत राहते. पीडित मुलगी अंध असल्यामुळे अर्थातच तिला कायम दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. २०१३ मध्ये पीडित मुलगी घरात एकटी असताना वहिनीच्या भावाने आणि त्याच्या मित्राने तिच्यावर अतिप्रसंग केला होता. त्यावेळी पीडित मुलीचे वय १७ वर्ष होते. त्यावेळी दोघांनी मुलीला घडलेल्या प्रकाराची महिती कुणाला सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे घडलेला प्रकार पीडित मुलीने कोणाला सांगितला नाही. अशातच क्षुल्लक कारणांवरून मुलीचा भाऊ आणि वहिनीमध्ये वाद होत होते. हे वाद विकोपाला गेल्याने मुलीच्या वहिनीने मुलीच्या भावा विरोधात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तर आई-वडिलांविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदवला होता. या गुन्ह्यात तिघांना अटक झाल्यानंतर पीडित मुलगी घरी एकटीच असल्याने तिच्या वहिनीकडून तिला वारंवार मारहाण केली जात होती.