जयपूरहून अजमेरला जात असलेल्या जर्मन तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. पीडितेने याची तक्रार रेल्वेच्या संकेतस्थळावर केली आणि सारे रेल्वे प्रशासन हादरले आहे. तक्रार मिळताच जयपूरच्या जीआरपीने कारवाई करत टीटीईला ताब्यात घेतले आणि निलंबित केले.
२५ वर्षीय जर्मन तरुणी जयपूरहून अजमेरला फिरण्यासाठी आली होती. यावेळी तिच्याकडे रिझर्व्हेशन नसल्याने ती जनरल डब्यात बसली होती. टीसीने हे पाहिले आणि तिला एसी डब्यात सीट देण्याचे सांगून तिथून घेऊन गेला. एसी कोचमध्ये नेल्यावर या टीसीने तिच्यासोबत अश्लिल कृत्ये करण्यास सुरवात केली. टीसी विशाल सिंह शेखावत याची तक्रार या तरुणीनीने रेल्वेकडे केली. ही तक्रार जीआरपीकडे पाठवून कारवाईचे आदेश देण्यात आले.
जीआरपीने विशाल सिंह शेखावतला अटक केली आहे. शेखावतला यापूर्वीही एका प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. याप्रकरणी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नरेंद्र यांनी सांगितले की, रेल्वे प्रशासनाने पीडित मुलीची तक्रार जयपूर जीआरपीकडे पाठवली आहे. यानंतर जीआरपीने या प्रकरणाचा तपास केला आणि टीटीईला निलंबित करण्यात आले.
ही तरुणी 13 डिसेंबर रोजी जयपूरहून अजमेरला जात होती. याप्रकरणी तिने १६ डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. रेल्वे प्रशासनाच्या पत्राच्या आधारे आरोपी टीटीई विरुद्ध कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास केला जात आहे. पीडितेने बुधवारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तिचे म्हणणे नोंदवले.